वंचितांच्या गावा जाऊया
दुरितांचे तिमिर जावो
विश्व स्वधर्म सूर्य पाहो
जो जे वांछिल तो ते लाहो
प्राणीजात |
संत ज्ञानेश्वर महाराजांना अभिप्रेत असलेली समाजव्यवस्था आज कुठे पहायला मिळते…? आपल्याला सर्वकाही आहे. दोन हात, पाय डोळे आणि बरंच काही… प्राथमिक गरजा तर आमच्या केव्हाच पूर्ण झाल्या आहेत. आता आम्ही भौतिक सुख – सोयी सुविधांच्या मागे धावत चाललो आहोत. आता पुढच्या महिन्यात जुनी मर्सिडीज विकून नवी मर्सिडीज घ्यायची आहे. जुनं घर तर आहेच पण परवा नवी जागा घेतली आहे तिथे आलिशान बंगला बांधायच नियोजन आहे. मुलाच लग्न झालं की मग तो राहील इथं. मुलगा वेगळा राहतो, सून सांभाळ करत नाही अशी तक्रार करणाऱ्यांनी या गोष्टीच आत्मचिंतन कराव की, अंतर कोण निर्माण करत आहे…? असो ही सगळी प्रपंचाच्या रहाटगाड्यात आणि ऐहीक सुखात अडकलेल्या आणि यातच जीवनाच सार मानणाऱ्या मानवजातीची ही कहाणी.
पण याच्याही पलिकडे एक जग आहे आणि ते म्हणजे अनाथ – निराधार, वंचित, अंध, अपंग, रंजल्या – गांजलेल्यांचे. हे वंचितांचे विश्व अनुभवण्यासाठी आणि त्यांच्या आयुष्यातील अंधार दूर करण्यासाठी कुणाला वेळ आहे…? आपण जीवन जगत असताना आपल्या मनासारखी गोष्ट नाही घडली की, आपल्याला दुःख होतं. खरं तर हे दुःख नव्हे. ही आहे जीवनाबद्दलची छोटीशी तक्रार.
तुम्हांला खरं दुःख अनुभवायच असेल तर वृध्दाश्रम,अनाथालय,अंध,मतिमंद,अपंगांच्या विविध ठीकाणी विखुरलेल्या संस्थांना भेट द्या. खरं दुःख आणि दुःखाची दाहकता तुम्हांला समजेल. याच्याव्यतीरिक्त दुःख असूच शकत नाही. याचा तुम्हांला अंदाज येईल.
आज आपल्याजवळ उद्योग – व्यवसाय, नोकरी, पैसा,सुबत्ता आणि महत्वाचे म्हणजे जीवनात स्थैर्य आहे. यामुळेच आपल्या जीवनात आनंद आहे. हा आनंद तुम्हांला वाटावासा वाटत नाही का…? तुम्ही पैशांच्या स्वरूपातच मदत करावी असं काही नाही. फळे,कपडे,अन्नदान,धान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंच्या माध्यमातून आपण हातभार लावू शकतो.
त्या वंचितांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून या केलेल्या सत्कर्म आणि पुण्यदानाचा आनंद इतर आनंदाहून शतपटीने मोठा असतो याचा आपल्याला प्रत्यय आल्याशिवाय राहणार नाही.
कवी विंदा करंदीकरांनी म्हटल्याप्रमाणे…
देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे
घेता घेता एक दिवस, देणाऱ्याचे हात घ्यावे
आज कोरोनासारखे जागतिक संकट, लॉकडाऊन प्रसंगी वाढलेली महागाई या सर्व समस्यांची खरी झळ कुणाला बसत असेल तर ती या वंचित, समाजापासून,घरादारापासून दुरावलेल्या घटकाला.
आपलं आयुष्य तर समृध्द आहेच, दुःखीतांचे आयुष्य समृध्द बनवूया. परमेश्वराच्या कृपेने सर्व काही मिळालेले आहे आपल्याला, असं सहजच आपण म्हणत असतो. मग आपल्या कृपेनेही मिळूदे या दिन – दुबळ्या – वंचितांना. हेच अभिप्रेत असतं ईश्वराही. म्हणूनच तो देत असतो भरभरून आपल्याला… भरलेली ओंजळ रिकामी होण्याअगोदरच ती भुकेल्याच्या वाट्याला जावी हीच खरी संस्कृती आणि सदाचार.
चला वंचितांच्या गावा जाऊया
वंचितांचे विश्व निकोप करूया
श्री. परशुराम माळी. शिक्षक, अनुभूती स्कूल,
जळगाव.7588663662.