जळगाव प्रतिनिधी । बेकायदेशीर गावठी बनावटीची दारू तयार करणारी महिलेला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज गुरूवार १५ एप्रिल रोजी दुपारी २ वाजेच्या दरम्यान अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
शहरातील सुप्रिम कॉलनी परिसरात स्पीरीट आणि रसायनाद्वारे बनावट दारू तयार होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली. आज गुरूवार १५ एप्रिल रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास पथक तयार करून रवाना केले. संशयित आरोपी सोनम बलविर उर्फ गुल्लू कंज (वय-३०) रा. सुप्रिम कॉलनी या महिलेच्या राहत्या घरात छापा टाकला असता घरात विनापरवाना व बेकायदेशीर गावठी दारू, मॅकडॉल व्हिस्की, आयबी व्हिस्की, देशी दारू टॅंगो असा एकुण ४ हजार ४७६ रूपये किंमतीची बनावट दारू हस्तगत केली आहे.
दारू बनविण्यासाठी लागणारे स्पिरीट, कच्चे व पक्के रसायन हस्तगत केले आहे. संशयित महिलेविरूध्द एमआयडीसी पोलीस स्थानकात मुंबई दारूबंदी कायदांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.