जळगाव :- शहरातील चोपडा मार्केटमध्ये काम करणार्या दुकानातील कामगाराने दुकानात विक्रीसाठी ठेवलेली ४ लाखाची सिगारेटचे बॉक्स लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी बुधवारी सायंकाळी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सिगारेट लांबविण्यास अटक करण्यात आली आहे. न्यायालयात हजर केले असता त्यास ३१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.कामगारानेच दुकानातील चार लाखांची सिगारेट बॉक्स लांबविले.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील दादावाडी परिसरातील वृद्धांवन कॉलनीतील रहिवासी रामचंद्र पुंडलीक पाटील यांचे भजे गल्लीतील चोपडा मार्केटमध्ये भारद्वाज एजन्सी नावाचे सिगारेट विक्रीचे दुकान आहे. रामचंद्र यांच्याकडे सागर जयंत पाटील हा युवक कामाला होता. रामचंद्र पाटील यांचा सागरवर विश्वास संपादन झाल्यामुळे सिगारेट विक्रीची जबाबदारी त्याच्यावर सोपविली होती.
चार महिन्यात लांबिवले सिगारेटचे बॉक्स
सागर पाटील याने ३० जून ते १९ ऑक्टोंबर पर्यंत दुकानातून वेळोवेळी स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी दुकानातील फोर स्न्वेअर सिगारेटचे १२० बॉक्स तर मालबोरो सिगारेटचे ७० असे एकूण ३ लाख ९० हजार रुपये किंमतीचे १२० बॉक्स त्याने लंपास केले.
संशयित आरोपीने पुरावा केला नष्ट
सिगारेट विक्री करणार्या दुकानातील मालाच्या खरेदी-विक्रीची दरारोज वहीमध्ये नोंद केली जात होती. सागरने त्याच्या आर्थिक फायद्यासाठी नोंद करणार्या वहीत खाडाखोड केलेली होती तर एक वही पुरावा मिळू नये म्हणून ती फेकून दिली असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी रामचंद्र पाटील यांच्या फिर्यादीवरुन सागर पाटील , जयंत पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
संशयित आरोपीला ३१ पर्यंत पोलीस कोठडी
जिल्हापेठ पोलिसात फसवणुकीसह चोरीचा गुन्हा दाखल होताच सागर जयंत पाटील (२४) रा. मानवसेवा शाळा, खोटेनगर याला बुधवारी रात्री ११.३० वाजता अटक करण्यात आली. त्याला गुरुवारी न्यायालयात हजर केले असता त्याला ३१ ऑक्टोंबर पर्यंत पोलीस कोठडी सूनावली आहे. सरकार पक्षातर्फे अॅडव्होकेट आशा शर्मा यांनी काम पाहिले .
अजून वाचा
बडतर्फे कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू