जळगाव प्रतिनिधी । मिनी लॉकडाऊनमुळे नाभिक समाज बांधवांना व्यवसाय सुरू करण्याची परवानगी द्यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र नेरपगारे यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदनाद्वारे केली आहे.
राज्य शासनाने राज्यात मिनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. यात सर्व व्यवसाय सोडून सलून व्यवसाय बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. हा महाराष्ट्रातील नाभिक समाजावार मोठा अन्याय होत आहे. पुर्वीच्या लॉकडाऊनमध्ये नाभिक समाज बांधवांचे व्यवसायीकांचे कंबरडे मोडले आहे. लॉकडाऊन उठल्यानंतर सलून व्यवसायधारकांने घरातील दागदागिने विकून दुकान भाडे, घरभाडे, विज बिलाचा भरणा केला आहे. काही समाज बांधवांनी व्यवसाय करण्यासाठी कर्ज काढले आहे. कर्जाचे हप्ते भरतांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. अशातच पुन्हा लॉकडाऊन केल्यामुळे नाभीक समाज बांधवांना जगायचे कसे हा प्रश्न उपस्थित राहिला आहे. याच कारणामुळे चोपडा तालुक्यातील वैजापूर येथील गणेश सुभाष सैंदाणे या तरूणाने गळफास घेवून आत्महत्या केली आहे. त्याच्या कुटुंबियांना १० लाख रूपयांची मदत जाहीर करावी. समाज बांधवांच्या मागण्या मान्य न झाल्यास महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळाच्या वतीने राज्यात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
या निवेदनावर संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र नेरपगारे, नारायण सोनवणे, आत्माराम महाले, लिना निकम, अनिता पाटील, ज्योती बरमत, निकीता राव, अर्चना जाधव, संगिता चौधरी, जयंत महाले, संजय सोनवणे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.