जळगाव – राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी माझ्यावर केलेले आरोप बिनबुडाचे असून माझ्याकडून कोट्यवधींची खंडणी संबंधित महिलेच्या मदतीने वसूल करण्याचा प्लॅन उधळला गेल्याने बनावट हनी ट्रॅपची रचना झाल्याची माहिती व्यापारी मनोज लीलाधर वाणी यांनी पत्रकार परिषदेत दिली. मात्र सबळ पुराव्यांविषयी विचारले असता मनोज वाणी हे समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाही.
वाणी म्हणाले की, संबंधित महिलेने ऐनवेळी नकार दिल्याने आपण व्यापाऱ्यांना खंडणी मागतो हे बिंग फुटेल म्हणून अभिषेक पाटील यांनी स्वतःहून हनी ट्रॅपचा खेळ रचून माझ्यावर आरोप लावला अशी माहिती मनोज वाणी यांनी दिली.
तसेच अभिषेक पाटील व त्यांच्या मातोश्री यांनी ४ ते ५ वर्षांपूर्वी एक हनी ट्रॅप यशस्वी केला होता. मात्र संबंधित महिलेने कोर्टात पाटील परिवाराचे पितळ उघडे पडले होते. तसेच अभिषेक पाटील व त्यांच्या मातोश्री यांनी शरद पवार व अजित पवार यांच्या नावाने शेतकऱ्यांच्या मुलांची नोकरी लावण्याच्या बहाण्याने आर्थिक फसवणूक केली आहे. शहरातील व्यापाऱ्यांकडून महिलांना पुढे करून खंडणी वसूल केली आहे.
अभिषेक पाटील यांनी एका माजी सैनिकाच्या परिवाराला १७ लाखांत गंडविले आहे. हे सर्व पुरावे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथराव खडसे, गुलाबराव देवकर यांच्याकडे ऑडिओ, व्हिडीओ पुरावे सादर करणार असल्याचेही ते म्हणाले.