जळगाव- शहरातील व्यावसायिकाची ३ लाख ९० हजार रूपयांची फसवणूक करणाऱ्या एकाला जिल्हापेठ पोलीसांनी अटक केली. आज न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
रामचंद्र पुंडलिक पाटील (वय-४९) रा. वृंदावन पार्क, दादावाडी यांचे भारद्वाज एजन्सीचे होलसेल सिगारेटचे दुकान आहे. दुकानातील माला घेण्यासाठी सागर जयंत पाटील (वय-२४) आणि जयंत पाटील दोन्ही रा. मानवसेवा केंद्र, खोटे नगर आला होता.
दररोज हा माल घेण्यासाठी येतो असा विश्वास ठेवून रामचंद्र पाटील यांनी दिलेल्या फोर स्क्वेअर, मालबोरो सिगारेटच्या पाकीटांपैकी सागर पाटील आणि जयंत पाटील दोघांनी १ लाख ८० हजार रूपये किंमतीची फोर स्क्वेअर सिगारेटचे १२० बॉक्स आणि २ लाख १० हजार रूपये किंमतीचे मालबोरो सिगारेटचे ७० बॉक्स असा एकुण ३ लाख ९० हजार रूपये किंमतीचा मुद्देमालाची अफरातफर केली.
ही बाब लक्षात आल्याने व्यापारी रामचंद्र पाटील यांच्या फिर्यादीवरून सागर पाटील आणि जयंत पाटील या दोघांविरोधात जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. रात्री उशीरा ११ वाजता मुख्य आरोपी सागर पाटील याला जिल्हापेठ पोलीसांनी अटक केली. आज न्यायालयात हजर केले असता दोन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पुढील तपास सपोनि किशोर पवार करीत आहे.