जळगाव – येथील मेहरुण परिसरातील शिवाजी उद्यानात महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या शंभरावर कर्मचार्यांना सोबत घेत आज दि. 1 एप्रिल रोजी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. तत्पूर्वी नगरसेवक कैलास सोनवणे व सुनील महाजन यांनी संबंधित उद्यानाची पाहणी केली.
त्यानंतर उद्यानाची भयानक दुरवस्था पाहून त्यांनी तत्काळ विधायकतेचा आदर्श घालून देत उद्यान परिसरात स्वच्छता अभियान राबवून 20 ट्रॅक्टरच्या मदतीने कचर्याची उचल करून ते चकाचक केले. श्री. सोनवणे व श्री. महाजन यांच्या या कार्याची मेहरुण परिसरात दिवसभर चर्चा सुरू होती.
गेल्या 2-3 वर्षांपासून मेहरुण परिसरातील शिवाजी उद्यानाची दुरवस्था झालेली होती. त्यामुळे या उद्यानाची प्रतिमा गर्दुल्यांचे निवासस्थान म्हणून परिचयास आलेली होती. त्यामुळे येथे दिवसभर गर्दुल्यासंह विविध विकृतींचे केंद्र व गुन्हेगारांचे आश्रयस्थान म्हणून ओळखले जात होते. या अनुषंगाने या उद्यानासंदर्भात विधायकतेतून चर्चा करीत नगरसेवक कैलास सोनवणे व श्री. सुनील महाजन यांनी विस्तृत चर्चा करून संबंधित उद्यानात तातडीने स्वच्छता अभियान राबवून परिसरातील नागरिकांसमोर जणू आदर्श घालून दिला.
शहरातील उद्यानांच्या दुरवस्थेसंदर्भात अनेकदा प्रसिद्धिमाध्यमांनी फोटोसह वृत्त प्रसिद्ध केल्याचे व त्यासंदर्भात महापालिकेच्या महासभेत जोरदार चर्चाही रंगलेल्या ऐकिवात आहेत. मात्र, उद्यानांच्या स्वच्छतेसह त्यांच्या सुशोभीकरणाच्या दृष्टीने थेट नगरसेवकांक़डून स्वतः कृतीत उतरून अभियान राबविले गेल्याचा बहुदा हा पहिलाच प्रसंग म्हणावा लागेल. त्यामुळे या विधायक विचारांनी एकत्र आलेल्या नगरसेवक कैलास सोनवणे व सुनील महाजन यांच्या या अभियानाचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.