जळगाव – कोविड १९ ने ग्रस्त असणाऱ्या काही रुग्णांमध्ये ‘म्युकोरमायकोसिस’ हे फंगल इन्फेक्शन आढळून येत आहे. म्युकोरमायकोसिस हे फंगल इन्फेक्शन नवीन नाही परंतु म्युकोरमायकोसिस संक्रमित रुग्णांचे आजवरचे प्रमाण हे अत्यल्प होते. कोविड १९ आजाराने ग्रस्त रुग्णांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेली असते त्यातच उपचार म्हणून स्टिरॉइड्स चे सेवन केले जाते आणि बहुतांश रुग्णांमध्ये अनियंत्रित मधुमेह असतो, अश्या विविध कारणांमुळे म्युकोरमायकोसिस हे जीवघेणे फंगल इन्फेक्शन डोके वर काढत आहे.यामुळे डोळ्याची दृष्टी जाऊ शकते प्रसंगी जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.या जीवघेण्या फंगल इन्फेक्शन चे प्रमाण कोविड १९च्या रुग्णांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येत आहे त्यामुळे लवकर निदान आणि उपचार गरजेचे आहे.
जळगावातील विविध रुग्णालयात कोरोनातुन बरे झालेल्या काही रुग्णांमध्ये या धोकादायक फंगल इंफेक्शनची लागण झाल्याचे आढळून आले आहे.त्यामुळे काही रुग्णांची दृष्टी कमकुवत झाली आहे. काही रुग्णांमध्ये नाक आणि जबड्याचे हाड काढून टाकावे लागण्याचीही भीती आहे. म्युकोरमायकोसिसमुळे काही रुग्णांना मृत्यूचा धोका देखील वाढताना दिसत आहे.
म्युकोरमायकोसिस म्हणजे काय?
म्युकोरमायकोसिस एक दुर्मीळ फंगल इंफेक्शन आहे, याला झिगॉमायकोसिस देखील म्हणतात. यात रोग आणि जंतूंचा सामना करण्याची क्षमता कमी होते.
म्युकोरमायकोसिस ची लक्षणे –
तोंडाच्या एका बाजूला सूज येणे,डोळ्याच्या बाजूला सूज येणे, डोकेदुखी, नाकाला सूज येणे,सायनस रक्तसंचय.
म्युकोरमायकोसिस कसा पसरतो?
श्वासोच्छवास आणि त्वचेच्या माध्यमातून रोगजंतू शरीरात प्रवेश करतात आणि वेगवेगळ्या अवयवांचे नुकसान करतात.म्युकोरमायकोसिस मेंदू, नाक,सायनस म्हणजेच हवेच्या पोकळ्यांमध्ये वाढते.सुरवातीला हे लक्षात येत नाही.मात्र चेहरा ,नाक डोळ्याला हळू हळू सूज येताच या फंगल इन्फेक्शन चे तात्काळ निदान करून उपचार करणे गरजेचे आहे.
उपचार म्हणजे नक्की काय?
डोळे, गाल आणि अनुनासिक अडथळा किंवा काळ्या कोरड्या कवचाची सूज आल्यावर अँटीफंगल औषधी त्वरित सुरू करावी. कोरोनामुळे प्रतिकार शक्ती कमी झाल्याने या फंगस चे संक्रमण वाढताना दिसून येत आहे.
‘म्यूकोरमायकोसिस’ या बुरशीजन्य संसर्गाने हाडांची झीज होणे, स्नायू कमकुवत होणे, डोळ्यांवर दुष्परिणाम होणे असा त्रास जाणवतो.
अँटी फंगल औषोधपचार आणि शस्त्रक्रियेद्वारे वेळीच उपचार झाल्यास डोळे वाचवण्यात डॉक्टरांना यश येऊ शकते. काही रुग्णांमधील पुढच्या टप्प्यातील या इन्फेक्शन मुळे हाडांची झीज झाल्याने ,आणि इन्फेक्शन नजीकच्या भागात, मेंदू पर्यंत पसरू नये यासाठी शस्त्रक्रिया करून झीज झालेले हाड काढावे लागते त्यात लगतचा अवयव गमवावा लागतो.
अनेकांना या आजाराबद्दल माहिती नसल्याने रूग्ण उशीरा डॉक्टरांकडे जातात. तेव्हा वेळीच नजरेत आलेल्या या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता आपल्या नेत्ररोग तज्ज्ञ आणि कान, नाक,घसा तज्ज्ञांचा सल्ला घ्या.कोविड १९ पासून मुक्त झाल्यावर नियमित व्यायाम, मधुमेहावर नियंत्रण मिळविण्यासाठी योग्य औषोधपचार, सोबत सकस आहार घ्या.
डॉ.धर्मेंद्र पाटील ,नेत्ररोगतज्ज्ञ,
जळगाव