मुंबई, वृत्तसंस्था : १ एप्रिलपासून नव्या आर्थिक वर्षाला सुरूवात होत आहे. मात्र नव्या आर्थिक वर्षात सामान्य माणसाला मात्र महागाईचे चांगलेच चटके बसतील, कारण दैनंदिन वापरातील गोष्टी चांगल्याच महाग होणार आहेत. जाणून घ्या कोणकोणत्या गोष्टी महाग होणार आहेत.
वाहने होणार महाग
मारुती सुझुकीसह सर्व ऑटो कंपन्यांनी १ एप्रिल २०२१ पासून कार आणि बाईक्सच्या किंमतीत वाढीची घोषणा केली आहे. किमती वाढण्यामागे त्यांनी वाढत्या खर्चाचे कारण दिले आहे. मारुती सुझुकीशिवाय निस्सान आणि रेनॉ्या कारही एक एप्रिलपासून महाग होत आहेत. तर हीरोने टूव्हीलरच्या किंमती वाढीची घोषणा केली आहे. तर शेतकऱ्यांनाही झटका बसणार आहे कारण ट्रॅक्टरच्याही किंमती वाढत आहेत.
टीव्ही होणार महाग
एक एप्रिल २०२१ पासून टीव्हीही महाग होणार आहेत. गेल्या काही महिन्यांपासून टीव्हीच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. १ एप्रिल २०२१ पासून टेलिव्हिजनच्या दरात २००० ते ३००० रूपयांपर्यंतची वाढ होऊ शकते. चीनवरून आयातीवरील बंदीमुळे टीव्हींच्या किंमतीत वाढ झाली आहे.
मोबाईल फोन होणार महाग
एक एप्रिलपासून मोबाईल फोन महाग होणार आहेत. अर्थ मंत्री निर्मला सीतारमण यांनी बजेटमध्ये इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांवरील इंपोर्ट ड्युटी वाढवण्याची घोषणा केली होती. यात मोबाईल पार्ट्स, मोबाईल चार्जर, अॅडॉप्टर, बॅटरी आणि हेडफोनचा समावेश आहे. इंपोर्ट ड्युटी वाढवल्याने प्रीमियम रेंजमधील स्मार्टफोन महाग होतील.
एसीही होऊ शकतात महाग
या उन्हाळ्यात जर तुम्ही एसी अथवा फ्रीज घेण्याचा विचार करताय तर तुम्हाला नक्कीच झटका बसू शकेल. नव्या आर्थिक वर्षात एसी आणि फ्रीजच्या किंमती वाढणार आहेत. कंपन्यांनी कच्च्या मालामध्ये वाढीचा हवाला दिला आहे. एसीचे दर १५०० रूपये ते २००० रूपयांपर्यंत वाढू शकतात. गेल्या महिन्यात ग्लोबल मार्केटमध्ये ओपन सेल पॅनेलच्या दरात ३५ टक्के वाढ झाली होती.
विमान प्रवास महागणार
नागरी विमान उड्डाणलयाने एक एप्रिलपासन एअर सिक्युरिटी फीसमध्ये वाढीची घोषणा केली आहे. यामुळे विमान प्रवास महागणार आहे. डोमेस्टिक फ्लाईट्सचे दर कमीत कमी ५ टक्के वाढू शकतात.
इंश्युरन्स प्रीमीयममध्ये वाढीची शक्यता
विमा कंपन्या १ एप्रिलपासून टर्म इंश्युरन्स प्रीमीयम महाग करण्याच्या तयारीत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार नव्या आर्थिक वर्षात टर्म इंश्युरन्सच्या प्रीमीयममध्ये १० ते १५ टक्के वाढ होऊ शकते. कोरोना संकटकाळात कंपन्याचा विमा खर्च खूप वाढला
उत्तर प्रदेशात दारू महागणार
उत्तर प्रदेशात दारूच्या किंमती १ एप्रिलपासून महाग होणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार एक एप्रिलपासून देशी आणि विदेशी दोन्ही दारूंच्या किंमती वाढणार आहेत. राज्य सरकारने दुसऱ्या देशातून येणाऱ्या म्हणजेच इम्पोर्टेड दारू, स्कॉच वाईन आणि वोडकाच्या परमिट फीमध्ये वाढ केली आहे.