मुंबई, वृत्तसंस्था : दादरच्या शिवतीर्थाजवलील महापौर निवास येथे विकसीत करण्यात येत असलेल्या बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे भूमीपूजन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते आज सायंकाळी करण्यात आले.
यावेळी उद्योग मंत्री तथा स्मारकाचे सचिव सुभाष देसाई, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री अनिल परब, महापौर किशोरी पेडणेकर, खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, राहुल शेवाळे, विनायक राऊत, आमदार सदा सरवणकर, रोहीत पवार, मुख्य सचिव सिताराम कुंटे, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त आर. ए. राजीव, मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल, मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते महापौर निवासाच्या प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते कळ दाबून स्मारकाच्या कामाची सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रांगणामध्ये वृक्षारोपण देखील करण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत स्मारकाच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले.
या ठिकाणी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात चित्रफितीच्या माध्यमातून स्मारकाविषयी सादरीकरण करण्यात आले. मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांसह वास्तुविशारद आभा लांबा, विकासक टाटा कंपनीचे विनायक देशपांडे यांचा सत्कार करण्यात आला.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचा भूमिपूजन सोहळा pic.twitter.com/iUSI0Y03NK
— ShivSena – शिवसेना (@ShivSena) March 31, 2021
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी संबंधातील बंधने लक्षात घेऊन मोजक्या उपस्थितांसह या भूमिपूजन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे ऑनलाईन थेट प्रक्षेपण देखील करण्यात आले.
स्मारकाची वैशिष्ट्ये
राज्य शासनाने या स्मारक योजनेसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची प्रकल्प समन्वयीन यंत्रणा म्हणून नियुक्ती केली आहे. स्मारकासाठी भू वापर व पर्यावरणासंबंधीच्या सर्व परवानग्या घेण्यात आल्या असून वास्तू उभारणीचा पहिला टप्पा 14 महिन्यांमध्ये पूर्ण केला जाणार आहे. या ठिकाणी वस्तुसंग्रहालय, कलादालने, संशोधन केंद्र, संग्राहागार, वाचनालय, चर्चासत्रांसाठी सभागृह असणार असून बाळासाहेबांच्या स्मृतींना उजाळा देणाऱ्या संग्रहालयाला आणि स्मारकाला अद्ययावत तंत्रज्ञानाची जोड देण्यात येणार आहे. त्याअंतर्गत महापौर निवास परिसराचे आणि आतील दालनांचे सुशोभीकरण करण्यात येणार असून छोटेखानी इमारती आणि भूमीगत रचना बांधण्यात येणार आहे.
बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचा मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा https://t.co/bAaT3NBei3
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) March 31, 2021