जळगाव – पाचशे व्यक्तींच्या उपस्थितीत कार्यक्रमाची परवानगी देण्यात यावी, यासह इतर विविध मागण्यांसाठी जळगाव टेन्ट ॲण्ड डेकोरेशन असोसिएशनच्यावतीने 2 नोव्हेंबर रोजी एक दिवशीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप श्रीश्रीमाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सकाळी 10 ते 5 पर्यंत एक दिवशीय उपोषण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात येणार असून मागणींचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. कोरोनामुळे या व्यावसायिकांवर संकट ओढावले आहे. यावेळी पत्रकार परिषदेला असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रितिश चोरडिया, सचिव सुनिल लुल्ला, कार्याध्यक्ष राजेश चोरडिया, कोषाध्यक्ष अजय अग्रवाल आदींची उपस्थिती होती.
अशा आहेत मागण्या
500 व्यक्तींच्या उपस्थितीत कार्यक्रमांना परवानगी देण्यात यावी, जीएसटी 18 टक्क्यांवरुन पाच टक्के करावा, टेंटचे साहित्य ठेवण्यासाठी व्यावसायिकांनी गोडावून भाड्याने घेतले आहे. त्यामुळे परिस्थिती सामान्य होईलपर्यंत भाडे घेऊ नये, असे निर्देश द्यावे, टेंट, मंडपामध्ये होणाऱ्या विवाह समारंभावर जागणारा जीएसटी वधू पित्याला परत मिळण्याचे तरतूद करावी, व्यवसाय चालविण्यासाठी बँकेकडून कर्ज उपलब्ध करून द्यावे, राज्य सरकार यांचे काम करणारे टेंट, केटरींग व्यावसायिकांचे बिल लवकरात लवकर द्यावे आदी मागण्या असोसिएशनतर्फे करण्यात आल्या आहेत.