जळगाव, प्रतिनिधी । महापालिकेतर्फे आज थकबाकीदार गाळेधारकांविरोधात कडक पोलीस बंदोबस्तात धडक कारवाईस प्रारंभ करण्यात आला.
थकबाकीदार गाळेधारकांविरोधात आज महापालिकेतर्फे गाळे सील करण्याची कारवाईस महात्मा गांधी मार्केट येथून प्रारंभ करण्यात आले असता व्यापाऱ्यांनी वाढीव कालावधी मागितल्याने कारवाई थांबविण्यात आली.
महापालिका उपायुक्त प्रशांत पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने महात्मा गांधी मार्केटमध्ये सकाळी ११ वाजेच्या सुमारास गाळे सील करण्यास कारवाईस सुरुवात करण्यात आली. प्रथम उत्तम कलेक्शन हे दुकान सील करण्यात आले. गाळे सीलची कारवाई होतांना दिसताच इतर व्यापाऱ्यांनी तेथे धाव घेतली.
यावेळी या व्यापाऱ्यांनी उपायुक्त प्रशांत पाटील यांच्याशी चर्चा करून थकबाकी भरण्यासाठी वाढीव मुदत देण्यात यावी अशी मागणी केली. यावर उपायुक्त पाटील यांनी वरिष्ठांशी चर्चा करून पुढील कारवाई करण्यात येईल असे या व्यापाऱ्यांना सांगत गाळे सीलची कारवाई थांबविण्यात आली. दरम्यान, महापालिका पथकात किरकोळ वसुली अधिकारी नरेंद्र चौधरी, प्रभारी अधीक्षक संजय ठाकूर, नाना कोळी, गोपी सपकाळे, ईश्वर ठाकूर, राजू शिंदे, मनोज तांबट, किशोर सोनवणे, राजू वाघ, शंकर बांदल आदींचा समावेश होता.