मुंबई – मुंबईत करोना पुन्हा एकदा नियंत्रणात येत असल्याचे चित्र आहे. आतापर्यंत मुंबईत एकूण १४ लाख ६८ हजारांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी २,५२,८८८ रुग्ण बाधित आढळले आहेत. म्हणजेच मुंबईतील बाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण १७.१७ टक्के इतके आहे.मुंबईत आतापर्यंत ८८ टक्के रुग्ण करोनामुक्त.
दरम्यान, बुधवारी १,३५४ नव्या रुग्णांची नोंद झाली असून ३१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर १७१६ रुग्ण बरे होऊन घरी गेले. मुंबईत आतापर्यंत ८८ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी १४४ दिवसांवर गेला आहे.
पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू
कांदिवली पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक महेश कडणे (४४) यांचा बुधवारी करोनाने मृत्यू झाला. अंधेरीतील सेव्हन हिल्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. कडणे यांना करोनाची लागण झाल्याचे २० ऑक्टोबरला निष्पन्न झाले होते. त्यानंतर पुढील उपचारांसाठी त्यांना अंधेरीतील सेव्हन हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मागील तीन दिवसांपासून त्यांची प्रकृती गंभीर होती. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. उपचारांदरम्यान बुधवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. ते बोरीवली पोलीस वसाहतीत वास्तव्यास होते. मंगळवापर्यंत राज्यभरात पोलीस दलातील २६२५४ पोलिसांना करोनाची बाधा झाली आहे. यात पोलीस दलातील २८७० अधिकाऱ्यांना, तर २३३८४ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सध्या १५८९ पोलीस करोनाबाधीत असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. तर २७ अधिकाऱ्यांचा व २५५ कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू झाला आहे.
राज्यात ९१ रुग्णांचा मृत्यू
मुंबई : राज्यात बुधवारी ६ हजार ७३८ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली. दिवसभरात ८ हजार ४३० रुग्णांनी या आजारावर मात केली असून ९१ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आजपर्यंत १४ लाख ८६ हजार ९२६ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतल्याने राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.५३ टक्यांवर पोहोचले आहे. सध्या राज्यभरात २५लाख २८ हजार ५४४ व्यक्ती गृहविलगीकरणात तर १२ हजार ९८८ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत.
अजून वाचा
अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांना मिळणार दिवाळीचा बोनस