जळगाव – आज शहराचे आमदार राजू मामा भोळे यांनी पत्रकार परिषदेत पुन्हा कोट्यवधींच्या वल्गना केल्या आणि शहराला पुन्हा मामा बनविण्याचे प्रयत्न केला. मुळात आम्ही जी मंडळी स्वतंत्र गटात बसलो त्यांची पक्षाबद्दल कोणतीही तक्रारच नव्हती. जी तक्रार आहे ती आमदारांच्या कार्यशैलीबद्दल आहे. सन्माननीय आमदार म्हणतात कि निधी आणला.. अहो पण आलेला २५ कोटी निधीही जर तीन तीन वर्ष खर्च करता येत नसेल तर मग तुमचा कारभार नियोजन शून्य होता हे का मान्य करत नाहीत ?
आज शहराची जनता वैतागली आहे. रस्त्यांची कामे कागदोपत्री मंजूर करायची, धूळफेक करायची, निविदा प्रक्रियेपर्यंत आले कि पुन्हा बदल करायचे.. होत असलेल्या प्रत्येक कामात घोळ घालायचा हि आमदारांची नियोजनशून्य कार्यपद्धती आहे.
उपमहापौर म्हणून मी दौरा सुरु केला ते काही स्वतः साठी नव्हता. जनतेत जाऊन त्यांच्या समस्या ऐकून घ्याव्यात त्यासाठी होता कारण आज शहरातील नागरिकांमध्ये रोष आहे. वास्तविक असे अभियान आमदार महोदयानी राबविणे गरजेचे होते. पण ते राहिले दूर तेव्हा हि आमदारांनी या अभियानाची पत्रकार परिषदेत खिल्ली उडविली होती.
पदासाठी अथवा वैयक्तिक लाभातून अथवा लोभातून एक दुसरा सदस्य बाहेर पडू शकतो जेव्हा निम्मे सदस्य बाहेर पडतात तेव्हा आमदारांनी आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे.