जळगाव/धुळे/नंदूरबार : राज्य शासनाच्या कृषिपंप वीजजोडणी धोरणाची अंमलबजावणी जळगाव परिमंडलात गतीने सुरू आहे. यात वीजबिलातील भरघोस सवलतीचा लाभ घेत खान्देशातील तिन्ही जिल्ह्यात 38 हजार 172 शेतकऱ्यांनी 37.33 कोटी भरून योजनेस उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. तसेच या धोरणांतर्गत कृषिपंपांच्या 993 नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.
कृषिपंप वीजजोडणी धोरणानुसार लघुदाब वीजवाहिनीच्या खांबापासून 30 मीटरच्या आत असलेल्या कृषिपंपांना जवळच्या रोहित्रावर पुरेशी क्षमता असल्यास नवीन वीजजोडणी देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यासोबतच ज्या कृषिपंपांद्वारे अनधिकृत वीजवापर सुरू आहे, त्यांनाही नवीन वीजजोडण्या देण्यात येत आहेत. ज्या ठिकाणी रोहित्रांवर क्षमता उपलब्ध नाही, त्या रोहित्रांची क्षमतावाढ करण्यात येणार आहे. लघुदाब वीजवाहिनीच्या खांबापासून 30 मीटरच्या आत अंतर असलेल्या जळगाव जिल्ह्यात 531, धुळे जिल्ह्यात 242 आणि नंदूरबार जिल्ह्यात 167 वीज जोडण्या अशा एकूण 940 जोडण्या जळगाव परिमंडलात देण्यात आल्या आहेत.
ऑक्टोबर 2020 मध्ये सुरू झालेल्या या योजनेत थकबाकी भरण्यासाठी भरघोस सवलत देण्यात आलेली आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात 14 हजार 591 शेतकऱ्यांनी 18 कोटी 8 लाख, धुळे जिल्ह्यात 15 हजार 721 ग्राहकांनी 9 कोटी 42 लाख, तर नंदूरबार जिल्ह्यातील 7 हजार 860 ग्राहकांनी 9 कोटी 83 लाख रुपये असे जळगाव परिमंडलातील एकूण 38 हजार 172 शेतकऱ्यांनी कृषिपंपांच्या वीजबिलापोटी 37 कोटी 33 लाख रुपये भरणा करून या योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेचा लाभ परिमंडलातील सर्वच शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी केले आहे.
राज्यात 1 एप्रिल 2018 नंतर प्राप्त झालेल्या अर्जांनुसार कृषिपंपांच्या नवीन वीजजोडण्या देण्याची प्रक्रिया ठप्प झाली होती. त्यास पुन्हा गती देण्यासाठी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी पुढाकार घेत राज्यात प्रथमच कृषिपंप वीजजोडणी व थकबाकीमध्ये सवलतीसंदर्भात स्वतंत्र धोरण तयार करण्याचे निर्देश दिले होते. त्याप्रमाणे कृषिपंप वीजजोडणी धोरण 2020 प्रत्यक्षात आले.
या अभियानानुसार लघुदाब वाहिनीपासून 30 मीटर व 200 मीटरच्या आत आणि रोहित्राची क्षमता पर्याप्त असलेल्या ठिकाणी तसेच उच्चदाब वाहिनीपासून 600 मीटरपर्यत उच्चदाब वितरण प्रणालीद्वारे एका रोहित्राद्वारे जास्तीत जास्त दोन कृषिपंपांना वीजजोडणी देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तसेच उच्चदाब वाहिनीपासून 600 मीटरपेक्षा अधिक अंतरावरील कृषिपंपांना सौर ऊर्जेद्वारे नवीन वीजजोडणी देण्यात येणार आहे.
महावितरणने कृषिपंप नवीन वीजजोडणी व थकबाकीमध्ये सवलत तसेच इतर मुद्द्यांच्या माहितीसाठी https://www.mahadiscom.in/solar/AG_Policy/index.php या स्वतंत्र वेब पोर्टलची निर्मिती केली आहे. तसेच ज्या कृषिपंपधारकांना नवीन वीजजोडणीसाठी अर्ज करावयाचा आहे त्यांना ऑनलाईन अर्ज करण्याची सोय उपलब्ध आहे. महावितरणच्या www.mahadiscom.in या अधिकृत वेबसाईटवर या वेब पोर्टलची लिंक देण्यात आली आहे.