जळगाव – गरबा पाहण्यासाठी गेलेल्या तरूणावर चॉपर हल्ला करणाऱ्या सहा जणांना एमआयडीसी पोलीसांनी अटक केली आहे. सहाही जणांना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
संतोष सुभाष कोळी (वय-२१, रा. कुसुंबा ता.जि. जळगाव) हे २५ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास दुचाकीने गावातील तुळजाईनगरात देवीच्या दर्शनासाठी जात असतांना एका मंडळाजवळ आले. दुचाकी पार्किंग करत असतांना गोलू उर्फ दत्तू नारायण चौधरी (वय-३२, रा. तुकाराम वाडी, जळगाव) हा जवळ येवून काहीही कारण नसतांना संतोष कोळी यांच्यावर चाकूने वार केले. यात छातीवर आणि कमरेला वार लागल्याने गंभीर जखमी झाले.
झालेल्या झटापटीत आपला स्वत:चा जीव वाचवत संतोष कोळी हे एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल झाले. मित्र पंकज गणपत योकुळे यांच्यासोबत उपचारासाठी गोदावरी हॉस्पिटलमध्ये जात असता उड्डाणपुलाजवळ कुणाल सुरेश पाटील(वय-२९, रा. तुळजाईनगर कुसुंबा), राहुल रामचंद्र बिऱ्हाडे (वय-३२, रा. रामेश्वर कॉलनी), गोलू उर्फ दत्तू नारायण चौधरी , मयुर उर्फ मनोज शालीक चौधरी (वय-२५, रा.दत्त मंदीरा तुकारामवाडी ), करण सुदर्शन शिंदे (वय-२१, रा. सुप्रिम कॉलनी) आणि सागर यशवंत ओतारी उर्फ अवतारे (वय-२१, कुसुंबा ता.जि.जळगाव) यांनी रस्ता अडविला. यावेळी पंकज गणपत गोडके आणि संतोष कोळी या दोघांना पुन्हा बेदम मारहाण केली. संतोष कोळी यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांनी पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील, अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, इमरान सैय्यद, सचिन पाटील, किशोर पाटील, सुधीर साळवे, योगेश बारी यांनी ही कारवाई केली. ५ आरोपींना रात्री १० वाजता आदर्शनगर जळगाव येथून ताब्यात घेतले होते. आज रोजी न्यायमूर्ती सुवर्णा कुलकर्णी यांच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप हजारे, रतिलाल पवार करीत आहे.