दुबई – आयपीएल स्पर्धेत किंग्ज इलेव्हन पंजाबच्या कामगिरीत प्रत्येक सामन्यागणिक सुधारणा होत आहे. सुरुवात विजयाने केल्यावर त्यांच्या कामगिरीला अचानक ब्रेक लागला होता, त्यांना गुणतालिकेत तळातील स्थान मिळाले होते. मात्र, गेल्या सहा दिवसांत त्यांनी सलग पाच सामने जिंकत प्ले-ऑफमधील स्थानाकडे कूच केली. हा बदल कसा झाला याची चर्चा सध्या सुरू झाली असून युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचा अंतिम संघात समावेश केल्यामुळे तोच संघासाठी लकी ठरल्याचे स्पष्ट दिसत आहे.
सोमवारी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात त्यांची सरशी झाली व सलग पाच सामने जिंकण्याची किमया पंजाबने साधली. गेलचा समावेश त्यांनी सुरुवातीच्या काही सामन्यांत केला नव्हता. स्पर्धेतील सुरुवातीचे काही सामने त्यांनी जिंकले. मात्र, तरीही त्यांना तळातील स्थानावर समाधान मानावे लागत होते आणि अचानक तीे विजयी मार्गावर आले व एका पाठोपाठ पाच सामने त्यांनी सलग जिंकले.
गेलचा समावेश अंतिम ११ खेळाडूंमध्ये केल्यापासून त्यांचे नशीब पालटले. गेलने मिळालेल्या संधीचे सोने करताना या ५ सामन्यात १७७ धावा फटकावल्या आहेत. या सामन्यांपूर्वी पंजाबचा संघ गुणतालिकेत ८ व्या स्थानावर होता. मात्र, आता सलग विजयांमुळे संघ चौथ्या स्थानावर हक्क सिद्ध करत आहे. हा चमत्कार केवळ गेलच्या समावेशामुळेच झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.
कोलकातावरील विजयानंतर पंजाब संघ व्यवस्थापनाने केलेले ट्विटही सोशल मीडियावर चांगलेच हीट झाले. ‘शेर की उम्र ज्यादा है लेकिन वो बुढा नहीं हुआ है’, अशा शब्दांत हे ट्विट करण्यात आले आहे. टी-२० क्रिकेटमध्ये गेलच्या नावावर १३ हजार ३४९ धावा आहेत. त्यातील जवळपास १० हजार धावा चौकार व षटकारांच्या माध्यमांतून काढलेल्या आहेत. केवळ चौकार व षटकारांच्या जोरावर १० हजार धावा करणारा गेल पहिलाच फलंदाज आहे. त्याने टी-२० कारकिर्दीत आतापर्यंत ४०५ सामने खेळताना ९८३ षटकार व १ हजार २७ चौकार फटकावले आहेत.