जळगाव प्रतिनिधी । शहरातील फातेमा नगरात दुचाकी अडविल्याच्या वादातून मध्यरात्रीच्या सुमारास जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली. यामध्ये चार जण जखमी झाले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुसुंबा व फातेमानगरातील तरुणांत वाद झाला. शाब्दिक वादाचे रूपांतर थेट हाणामारीत झाले. या वेळी तरुणांनी एकमेकांवर दगडफेक करून दुचाकींची तोडफोड केली. तसेच फातेमानगरातील साई प्रसाद कंपनीतदेखील तोडफोड करण्यात आली. यात चार तरूण जखमी झाले असून त्यांना शासकीय वैद्यकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, हाणामारी सुरू असतांना याबाबत काही नागरिकांनी एमआयडीसी पोलिसांना माहिती दिल्यानंतर एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे, अतुल वंजारी, गोविंदा पाटील यांच्यासह अन्य कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गर्दी पांगवून परिस्थती नियंत्रणात आणली. तसेच पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले. तर काही संशयितांचा शोध सुरू होता. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, वाद सुरू असताना काहींनी हवेत गोळीबार केल्याची अफवा परिसरात पसरली.
मात्र पोलीस प्रशासनाने याला नकार देत असला प्रकार झाला नसल्याचे सांगितले. हाणामारी झाल्यानंतर परिसरात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. रात्री उशीरापर्यंत या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


