कंगना राणावतने आता ‘तेजस’च्या कामाला सुरुवात केली आहे. तिने सोमवारी एक व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला आणि ‘तेजस’बाबतची माहिती दिली. या व्हिडिओमध्ये ‘तेजस’च्या पूर्वतयारीसाठी आयोजित एका वर्कशॉपमधील व्हिडिओ दाखवला आहे. यात दिग्दर्शक सर्वेश मेवाडा आणि विंग कमांडर अभिजीत गोखले यांच्यासह कंगना सहभागी झालेली दिसते आहे.
टॅलेंटेड दिग्दर्शक सर्वेश मेवाडाबरोबर ‘तेजस’च्या वर्कशॉपमध्ये सहभागी झाल्याचा खूप आनंद होतो आहे. आता लवकरच ‘तेजस’च्या प्रत्यक्ष शूटिंगलाही सुरुवात होईल, असे कंगनाने या व्हिडिओमध्ये म्हटले आहे. कंगनाने अलीकडेच ‘तेजस’चे पोस्टरदेखील रिलीज केले आहे.
‘तेजस’मध्ये कंगना लढाऊ विमान उडवताना दिसणार आहे. वेगवेगळ्या कारणास्तव सतत वादाच्या भोवऱ्यात असलेल्या कंगनाने काही दिवसांपूर्वी ओटीटी प्लॅटफॉर्मवरच्या वेबसिरीजवरही टीका केली होती. वेबसिरीजमध्ये अश्लीलता आणि हिंसेचा अतिरेक दाखवला जात असल्याची टीका तिने केली होती.
थिएटरमध्ये दाखवण्यालायक आणि सर्वसामान्य प्रेक्षकांनी सहकुटुंब बघता येतील, असे सिनेमे बनवले जायला हवेत, असे तिने म्हटले होते. सर्व स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म सध्या केवळ पोर्न हब बनत चालले आहेत. ही अतिशय लाजीरवाणी गोष्ट आहे, अशी टीकाही कंगनाने केली आहे.


