जळगाव – जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मनाेहर पाटील यांना अपात्र ठरवत त्यांचे संचालक पद रद्द करण्याचा आदेश राज्याचे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिला आहे.
मनाेहर पाटील यांनी बाजार समितीच्या निवडणुकीत ग्रामपंचायत गटातून निवडणूक लढली हाेती. त्यात ते विजयी झाले हाेते. परंतु पाटील हे ६ ऑगस्ट २०१५ राेजीच्या ग्रामपंचायत निवडणुकीत ते उमाळे ग्रामपंचायतीचे सदस्य पदावर निवडून आले नाहीत. कैलास साेमा सानप यांनी मनाेहर पाटील यांच्या अपात्रतेच्या संदर्भात तक्रार केली हाेती.
या संदर्भात पुणे येथील पणन संचालकांनी ३१ जानेवारी २०२० राेजी तक्रारदार सानप यांचा अर्ज नामंजूर केला हाेता. याविराेधात सानप यांनी अर्ज दाखल केला हाेता. याप्रकरणी १८ ऑगस्ट व ६ ऑक्टोबर राेजी सुनावणी घेण्यात आली हाेती. त्यात अर्जदार सानप व प्रतिवादींनी म्हणणे सादर केले आहे . सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील (थाेरात) यांच्याकडे याप्रकरणी सुनावणी झाली.
या चौकशी दरम्यान ते बाजार समितीच्या संचालकपदावर राहण्यास अपात्र ठरत असल्याचे निरीक्षण नाेंदवण्यात आले. तसेच मनाेहर पाटील यांनी सुनावणी दरम्यान त्यांचे लेखी अथवा ताेंडी म्हणणे सादर केले नाही. त्यामुळे त्यांचे काहीही म्हणणे नाही, असे गृहीत धरून मनाेहर पाटील यांचे संचालक पद अपात्र ठरवून रद्द करण्यात येत असल्याचा आदेश दिला आहे.