Apple या कंपनीनं आपल्या युझर्सना एक मोठा झटका दिला आहे. अॅप स्टोअरमधून कोणतंही अॅप विकत घ्यायचं असल्यास त्यासाठी युझरला आता अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. भारत, इंडोनेशिया, ब्राझील, कोलंबिया, दक्षिण आफ्रिका आणि रशिया या देशांमध्ये कंपनी आपल्या इन अॅप परचेसच्या दरात वाढ करणार आहे. करामध्ये वाढ केल्यामुळे या दरांमध्ये वाढ होत असल्याचं अॅपलनं ब्लॉग पोस्टमध्ये म्हटलं आहे. भारताबाबत सांगायचं झाल्यास या ठिकाणी इंटरनेट कंपन्यांवर १८ टक्के जीएसटी व्यतिरिक्त २ टक्के कर (equalisation levy) आकारण्यात येतो.
इक्वलायझेशन लेवी हा एक प्रकारचा कर आहे जो परदेशी तंत्रज्ञान कंपन्यांकडून डिजिटल व्यवहारांद्वारे होणाऱ्या कमाईवर आकारण्यात येतो. तर दुसरीकडे इंडोनेशियाबाबत सांगायचं झाल्यास देशाच्या बाहेरील कोणत्याही डेव्हलपर्सना १० टक्क्यांचा नवा कर द्यावा लागतो. “ज्यावेळी फॉरेन एक्सचेंज रेटमध्ये बदल होतो त्यावेळी आम्हाला अॅप स्टोअरवरील किंमती कमी जास्त कराव्या लागतात. पुढील काही दिवसांमध्ये अॅप स्टोअरवर अॅप आणि इन अॅप परचेस (ऑटो रिन्युअल सोडून) ब्राझील, भारत, कोलंबिया, इंडोनेशिया, रशिया आणि दक्षिण आफ्रिकेत दर वाढवले जातील,” असं अॅपलनं स्पष्ट केलं आहे.
नवे दर जाणून घेण्यासाठी युझर्सना अॅपल डेव्हलपर पोर्टलच्या My Apps या ठिकाणी असलेल्या Pricing and Availability या सेक्शनमध्ये जावं लागेल, असं कंपनीनं म्हटलं आहे. दरम्यान, अॅपल भारतात देत असलेल्या Apple Music, Apple TV+ आणि iCloud या सेवांच्या दरात बदल करणार आहे का हे मात्र अद्याप कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलेलं नाही.