दुखापतीमुळे रोहित शर्मा ‘आयपीएल’मधील सलग तिसऱ्या सामन्याला मुकणार आहे, परंतु तरीही बाद फेरीतील स्थान निश्चित करण्यासाठी मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु यांच्यातील कडवी झुंज बुधवारी पाहायला मिळेल.
राजस्थान रॉयल्सकडून पराभव पत्करल्यानंतरही १४ गुण खात्यावर असलेला मुंबईचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. चेन्नई सुपर किंग्जकडून पराभूत झालेल्या बेंगळूरु संघाचेही १४ गुण झाले आहेत. त्यामुळे ‘आयपीएल’ गुणतालिकेत सुरक्षित असलेल्या या संघांपैकी जो संघ जिंकेल, तो बाद फेरीमधील स्थान पक्के करील.
रोहितच्या अनुपस्थितीत सौरभ तिवारी आणि इशान किशन (२९८ धावा) यांनी दमदार खेळी साकारून लक्ष वेधले आहे. क्विंटन डीकॉक (३७४ धावा) आणि सूर्यकुमार यादव (२८३ धावा) यांनी आक्रमक फलंदाजीसह मुंबईच्या फलंदाजीची धुरा सांभाळली आहे. याशिवाय हाणामारीच्या षटकांत हार्दिक पंडय़ा (२२४ धावा) आणि प्रभारी कर्णधार किरॉन पोलार्ड (२१४ धावा) यांनीही महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. मोक्याच्या क्षणी कृणाल पंडय़ासुद्धा उपयुक्त ठरला आहे.
जसप्रित बुमरा आणि ट्रेंट बोल्ट यांनी एकत्रितपणे ३३ बळी घेत प्रतिस्पर्धी फलंदाजांवर अंकुश ठेवला आहे. जेम्स पॅटिन्सन आणि नॅथन कोल्टर-नाइल यांच्यापैकी एकाची तिसऱ्या स्थानासाठी निवड होईल.
दुसरीकडे, बेंगळूरुच्या फलंदाजीची भिस्त विराट कोहली (४१५ धावा), आरोन फिन्च (२३६ धावा), देवदत्त पडिक्कल (३४३ धावा) आणि एबी डीव्हिलियर्स (३२४ धावा) यांच्यावर आहे. मधल्या फळीत ख्रिस मॉरिस, मोइन अली आणि गुरकिराट मान यांचा समावेश आहे.
* सामन्याची वेळ : सायं. ७.३० वा.
* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १ आणि ‘एचडी’ वाहिन्या