मुंबई – शिवसेना आणि अभिनेत्री कंगना राणावत यांच्यामधील वादामुळे मुंबई महापालिकेला ८२ लाख ५० हजार रुपयांचा भरुदड सोसावा लागला आहे. सर्वसामान्य मुंबईकरांना कराच्या रूपात मुंबई महापालिकेच्या तिजोरीत जमा केलेली ही रक्कम कंगना राणावतविरोधात सुरू असलेल्या न्यायालयीन लढाईसाठी खर्च झाले आहेत.
अभिनेता सुशांत राजपूत प्रकरणावरून वादग्रस्त विधान केल्यानंतर कंगना राणावत विरुद्ध शिवसेना असा वाद रंगला होता. मुंबई महापालिकेच्या ‘एच-पश्चिम’ विभाग कार्यालयाने पाली हिल येथील कंगना राणावतच्या कार्यालयातील अनधिकृत बांधकामावर हातोडा चालविला. या प्रकरणी कंगना राणावतने न्यायालयात धाव घेत दाद मागितली आहे.
या प्रकरणी पालिकेच्या बाजूने ज्येष्ठ वकील, वरिष्ठ अधिवक्ता अस्पी चिनॉय न्यायालयात बाजू मांडत आहेत. या न्यायालयीन लढाईसाठी पालिकेला आतापर्यंत ८२ लाख ५० हजार रुपये खर्च आला आहे. आतापर्यंत या प्रकरणी अस्पी चिनॉय यांनी ११ वेळा न्यायालयात पालिकेची बाजू मांडली. प्रत्येक तारखेसाठी सात लाख ५० हजार रुपये याप्रमाणे पालिकेला ८२ लाख ५० रुपये खर्च आला आहे.
शरद यादव यांनी पालिकेच्या विधि खात्याकडे ‘माहितीचा अधिकार कायद्या’अंतर्गत अर्ज करून कंगना राणावत विरुद्ध महापालिका प्रकरणात अस्पी चिनॉय यांना देण्यात आलेल्या शुल्काबाबतची माहिती मागितली होती. विधि खात्याने दिलेल्या माहितीच्या आधारे ही बाब उघड झाली आहे.
करोनाकाळात पालिकेची आर्थिक स्थिती डळमळीत होत आहे. अशा वेळी इतकी मोठी रक्कम केवळ एका न्यायालयीन प्रकरणावर खर्च करणे कितपत योग्य आहे, असा सवाल शरद यादव यांनी केला आहे.


