नाशिक : कांद्याची दरवाढ रोखण्यासाठी केंद्र सरकारने साठवणुकीवर घातलेल्या निर्बंधामुळे जिल्ह्यातील १२ बाजार समित्यांमधील कांद्याचे लिलाव सलग दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारीदेखील बंद राहिले. लासलगाव, पिंपळगाव बसवंत बाजार समित्यांमध्ये सहकार विभागाने व्यापारी संघटना, बाजार समिती पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून तोडगा काढण्याचा केलेला प्रयत्न निष्फळ ठरला. आधी खरेदी केलेल्या मालाची विल्हेवाट लागत नाही, तोवर नवीन माल कसा खरेदी करणार, या व्यापाऱ्यांच्या प्रश्नावर प्रशासनाकडे उत्तर नव्हते. साठवणुकीच्या निकषात उत्पादक भरडला जात असून खराब होण्याआधी कांदा विक्री करण्याची चिंता त्यांना सतावत आहे.कांद्याचे घाऊक बाजार दुसऱ्या दिवशीही ठप्प.
किरकोळ व्यापारी दोन तर घाऊक व्यापारी २५ टन कांद्याची साठवणूक करू शकतात. ३१ डिसेंबपर्यंत साठवणुकीची ही मर्यादा कायम राहणार आहे. या निर्णयामुळे कांद्याचे भाव मागील आठवडय़ात दीड हजार रुपयांनी गडगडले होते. आता हाच निकष घाऊक कांदा लिलावात अडथळा ठरल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.कांद्याचे घाऊक बाजार दुसऱ्या दिवशीही ठप्प
या तिढय़ावर तोडगा काढण्यासाठी सहकार विभागाने लासलगाव, पिंपळगाव येथील व्यापाऱ्यांशी स्वतंत्र बैठकीच्या माध्यमातून चर्चा केली. बाजार समितीचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. परंतु, नवीन माल खरेदी केल्यास केंद्राच्या निकषाचे उल्लंघन होईल, याकडे व्यापाऱ्यांनी लक्ष वेधले. यामुळे कांदा लिलाव लवकर सुरळीत होण्याची शक्यता धूसर झाली आहे. या सर्व घटनाक्रमात उत्पादकांची कोंडी झाली आहे. बाजार समित्यांना लिलावात सहभागी न होणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याची सूचना करण्यात आल्याचे सहकार उपनिबंधक सतीश खरे यांनी सांगितले.
कांदा लिलाव बंद असल्याने सणासुदीच्या काळात, रब्बी हंगामातील कांद्याची लागवड करण्याचे काम वेगात सुरू असताना उत्पादकांना आर्थिक तरतुदीची गरज आहे. बाजार समित्यांचे कामकाज बेमुदत बंद राहून पुढे बाजार समित्यांचे कामकाज सुरू झाल्यानंतर अचानक कांद्याची मोठय़ा प्रमाणात आवक होऊन उलट दर घसरण्याचा धोका असल्याकडे संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी लक्ष वेधले आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत सर्व बाजार समित्यांत लिलाव सुरळीत सुरू न झाल्यास महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली जिल्हाभर रास्ता रोको आंदोलन केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
अजून वाचा
खा. संजय जाधव यांना जीवे मारण्यासाठी दोन कोटींची सुपारी