पाचोरा -जिल्हानिहाय शिक्षक साहित्यिकांचे संमेलनं झाली पाहिजे असे आवाहन सुप्रसिद्ध कवी तथा निवृत्त शिक्षण उपसंचालक प्राथमिक शशिकांत हिंगोणेकर यांनी केले. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त पाचोरा येथील देसले क्लासेस सभागृहात भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी जळगाव संचलित प्रथम शाखेचे उद्घाटन करण्यात आले त्याप्रसंगी कवी हिंगोणेकर अध्यक्ष स्थानावरून मार्गदर्शन करतांना बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख अतिथी पुस्तक भिशी जिल्हा प्रमुख कवी विजय लुल्हे,अथर्व पब्लिकेशनचे संचालक युवराज माळी,पत्रकार शिवाजीशिंदे, सुनीलपाटील, डॉ.वाल्मीकअहिरे, भैय्यासाहेब सोमवंशी,राजेंद्र पाटील मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी ज्ञानपिठ पुरस्कृत कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले.पुस्तक भिशी जिल्हा प्रमुख विजय लुल्हे यांनी पुस्तक भिशी उपक्रमाची संकल्पना, नियमावली, कार्यपद्धती व पुरक उपक्रमांबाबत मागदर्शन केले. संवेदनशील वाचक ,समाजाभिमुख लेखक आणि द्रष्टे प्रकाशक हे वाचन चळवळीचे मुलाधार आहेत असे प्रतिपादन लुल्हे यांनी केले.
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त स्वाती पाटील यांनी कुसुमाग्रज लिखित’ प्रेम म्हणजे ‘ व डॉ.वाल्मिक अहिरे यांनी ‘ कणा ‘ या कविता सादर केल्या.दिवगंत प्रसिद्ध गझलकार ईलाही जमादार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.सारीका पाटील यांनी स्व.जमादारांची प्रसिद्ध गझल सादर केली.सुभाष देसले मार्गदर्शनात म्हणाले की अवांतर वाचनाने स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांचा ध्येयवाद व एकाग्रता वर्धिष्णू होते.
पाचोरा पुस्तक भिशीचा पहिला लकी ड्रॉ कवीवर्य हिंगोणेकर व कुमुद प्रकाशनाच्या संचालिका संगिता माळी यांच्या हस्ते काढण्यात आला.ड्रॉ नुसार भाग्यवान विजेते भैय्यासाहेब सोमवंशी व अशोक परदेशी यांनी स्वत:च्या आवडीनुसार पुस्तके निवडली.पुस्तक भिशी उपक्रमाचा प्रारंभ नियोजनबद्ध केल्याच्या सन्मानार्थ प्रमुख समन्वयक सारिका पाटील व अरुणा उदावंत यांचा भिशी जिल्हा प्रमुख विजय लुल्हे यांच्या तर्फे शाल व पुस्तके देऊन मान्यवरांच्या हस्ते हृद्य सत्कार करण्यात आला.अथर्व प्रकाशनातर्फे उपस्थितांना संगिता माळी यांच्या हस्ते ग्रंथ प्रकाशन सुचीसह कॅलेंडर्स सन्मापूर्वक भेट देण्यात आले. कार्यक्रमास कल्पना देसले,गायत्री पाटील,राकेश सपकाळे यांसह ग्रंथप्रेमी उपस्थित होते.