जळगाव प्रतिनिधी । शहरातील पंचमुखी हनुमान मंदिराजवळ असलेल्या पद्मावती मंगल कार्यालयाजवळ 15 लाखांची रोकड घेऊन जात असलेल्या दोन जणांना भरदिवसा रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून 15 लाखात लुटल्याची घटना आज सायंकाळच्या सुमारास घडली. या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपींचा शोध सुरू आहे.
आज सायंकाळी 4.15 वाजेच्या सुमारास महेश चंद्रमोहन भावसार (वय ५३, रा. दिक्षीतवाडी, जळगाव) आणि संजय सुधाकर विभांडीक (वय५१, रा. महाबळ कॉलनी, जळगाव) हे १५ लाख रूपयांची रोकड घेऊन सिव्हील हॉस्पीटलच्या दिशेने जात होते. यातील महेश भावसार यांच्याकडे रोकड असून ते एका दुचाकीवर होते. तर विभांडीक हे त्यांच्या सोबत दुसर्या दुचाकीवरून जात होते. हे दोन्ही जण पंचमुखी हनुमान मंदिराजवळच्या पद्मावती मंगल कार्यालयाजवळ आले असतांना त्यांना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी थांबवण्याचा प्रयत्न केला.
झटापटीत रिव्हॉल्व्हरची मॅगेझीन खाली पडली
यातील एकाने महेश भावसार यांच्याकडून रोकड असणारी बॅग लांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र यात त्याला यश आले नाही. यामुळे चोरट्याने रिव्हॉल्व्हर काढून त्यांना धमकावले. याप्रसंगी झालेल्या झटापटीत रिव्हॉल्व्हरची मॅगेझीन खाली पडली. एक चोरटा दुचाकीवरून तर दुसरा पळत जाऊन घटनास्थळावरून फरार झाला. अवघ्या काही मिनिटांमध्ये हा थरार घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
दोन्ही चोरट्यांनी एकाच दिशेने पलायन
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रत्यदर्शीच्या मते दोन्ही चोरट्यांनी एकाच दिशेने पलायन केले. पोलिसांनी खाली पडलेले मॅगेझीन जप्त करून चौकशीस प्रारंभ केला आहे. भर दिवसा घडलेल्या या घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
परिसरातील सीसीटिव्हीमध्ये हे चोरटे दिसून येतील अशी शक्यता असून पोलिसांनी या दृष्टीने तपास सुरू केला आहे. एका फुटेजमध्ये चोरट्याच्या शरीराचा खालील भाग आला असून तो वेगाने पळत असल्याचे दिसून आले आहे. यात रिव्हॉल्व्हर दाखवून धमकावणार्या चोरट्याने जीन्सची पँट आणि पांढरा शर्ट घातल्याची माहिती भावसार आणि विभांडीक यांनी दिलेली आहे