जळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात जन्मतः च कमी वजन असलेल्या बाळाला तब्बल ५६ दिवसांच्या दीर्घ उपचारानंतर वाचवण्यात यश आले. त्या बाळाला पूर्ण बरे करून सोमवारी १ मार्च रोजी अधिष्ठाता, वैद्यकीय अधीक्षक यांच्या उपस्थितीत घरी जाण्यासाठी सुटी देण्यात आली.
एरंडोल येथील खडकेसीम गावातील हलाखीची परिस्थिती असलेल्या मंगल व अनिता जोगी या दाम्पत्याला जानेवारी महिन्यात मुलगी झाली. मात्र जन्मतःच बाळाचे वजन ८३० ग्राम होते. त्यामुळे बाळाला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी ४ जानेवारी रोजी नवजात शिशु अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. त्याला आयसीयूमध्ये दाखल करून उपचार सुरु झाले. उपचारादरम्यान बाळाला २ वेळा रक्त चढवावे लागले.
बाळाच्या आईला व नातेवाईकांना धीर देत त्यांना बाळाची काळजी कशी घ्यावी तसेच कांगारू मदर केअरविषयी आरोग्य शिक्षण देण्यात आले. त्यानुसार तब्बल ५६ दिवसांनी बाळाचे वजन वाढून १ किलो ३०० ग्राम झाले. यासाठी वैद्यकीय पथकाने अथक परिश्रम करून बाळाला जीवदान दिले. बाळावर उपचारासाठी नवजात शिशु अतिदक्षता विभागाच्या इन्चार्ज डॉ. वृषाली सरोदे, डॉ. हितेंद्र भोळे, डॉ. शैलजा चव्हाण, डॉ. अखिलेश खिलवाडे यांच्यासह परिचारिकांनी परिश्रम घेतले. यावेळी मार्गदर्शक अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैभव सोनार,उप वैद्यकीय अधीक्षक डॉ. इम्रान पठाण, बालरोगचिकित्साशास्त्र विभाग प्रमुख डॉ. बाळासाहेब सुरोशे यांच्या उपस्थितीत डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी डॉ. विजय गायकवाड उपस्थित होते