मुंबई, वृत्तसंस्था – महाराष्ट्र राज्य गुप्तवार्ता विभागात (एसआयडी) कार्यरत असलेल्या ३२ गुप्तवार्ता अधिकाऱ्यांना वरिष्ठ गुप्तवार्ता अधिकारी म्हणून बढती देण्यात आली आहे. विभागाचे आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी त्याबाबतचे आदेश नुकतेच बजविले आहेत.
गेल्या काही वर्षांपासून कार्यरत असलेल्या या अधिकाऱ्यांपैकी काहींनी पदोन्नतीसाठी महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरणामध्ये (मॅट) धाव घेतली होती. त्याबाबत त्यांनी दिलेल्या निर्देशानुसार एसआयडीने सेवाज्येष्ठतेननुसार ३२ अधिकाऱ्यांच्या बढतीचे आदेश जारी केले. संबंधितांना आवश्यकतेनुसार राज्यातील विविध घटकांमध्ये बदली करण्यात आली आहे. त्यांना तातडीने संबंधित ठिकाणी रुजू होण्याची सूचना करण्यात आली आहे.