नवी दिल्ली – लॉकडाउनबाबत केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. कंटेन्मेंट झोनमध्ये म्हणजेच करोना प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये लॉकडाउन ३० नोव्हेंबरपर्यंत कायम राहिल असं केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. देशात अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली आहे. अनेक गोष्टींना केंद्र सरकारने नियम आणि अटींसह संमती दिली आहे. मात्र करोना प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये लॉकडाउन कायम असणार आहे असं केंद्रीय गृहमंत्रालयाने म्हटलं आहे.
देशभरात मार्च महिन्यापासून लॉकडाउन सुरु करण्यात आला. त्यानंतर अनलॉकच्या प्रक्रियेत हळूहळू अनेक गोष्टींना संमती देण्यात आली आहे. करोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होताना दिसतो आहे. भारतातील करोना रुग्णांच्या एकूण संख्येत वाढ झाली असली तरीही करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. एवढंच नाही तर अॅक्टिव्ह केसेसच्या संख्येतही घट झाली आहे. असं असलं तरीही संपूर्ण काळजी घेऊनच जिम, रेस्तराँ, हॉटेेल्स हे सगळं उघडण्यास केंद्र सरकारने संमती दिली आहे. अशात करोना कंटेन्मेंट झोन म्हणजेच करोना प्रतिबंधित क्षेत्रात लॉकडाउन पूर्वीप्रमाणेच असेल आणि ३० नोव्हेंबरपर्यंत तो असेल असं केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.
गृह मंत्रालयाने आज (२७ ऑक्टोबर) पुढील काळात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काय खबरदारी घ्यायची आणि कोणत्या गोष्टींमध्ये सूट असेल याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यानुसार रिओपनिंगबाबत ३० सप्टेंबरला जारी केलेली मार्गदर्शक तत्त्वे ३० नोव्हेंबरपर्यंत कायम ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.