जळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात अपघातात जखमी झालेल्या रुग्णाला जीवदान देण्यात यश आले आहे. या रुग्णाचे प्लिहा हे अवयव फुटल्यामुळे जीव धोक्यात आला होता.
जळगाव येथे झालेल्या अपघातात ३१ जानेवारी रोजी ३५ वर्षीय तरुण गंभीर झाला होता. त्याला उपचारार्थ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पोटाला, डोळ्याला आणि डाव्या पायाला या तरुणाला जबर मार लागलेला होता. अशा परिस्थितीत त्याची तपासणी झाली. अंतर्गत रक्तस्त्राव झाल्यामुळे त्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यात पोटामध्ये प्लिहा हा अवयव फुटल्यामुळे शरीराच्या आतील भागात रक्त्तस्राव झाल्याचे दिसले. तत्काळ प्लिहा शरीरातून काढून टाकण्यात आला. त्यानंतर तरुणाला तज्ञांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले. रुग्णाला एकूण ३ रक्ताच्या पिशव्या लागल्या.
त्याच्या प्रकृतीत पूर्ण सुधारणा झाल्यावर नुकताच डिस्चार्ज देण्यात आला आहे. तरुणावर अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, उप अधिष्ठाता तथा शल्यचिकित्सा शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. मारोती पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. संगीता गावित, डॉ. रोहन पाटील, भूलतज्ज्ञ डॉ.सचिन पाटील, डॉ. स्वप्नील इंकणे, अधिपरिचारिका प्रियांका पाटील यांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली. रुग्णाच्या नातेवाईकांनी वैद्यकीय यंत्रणेचे आभार मानले आहेत.