जळगाव, – कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीचा ईद- ए-मिलाद (मिलादुन नबी) जुलूस साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावर्षी दिनांक 30 ऑक्टोबर, 2020 रोजी ईद-ए-मिलाद (मिलादुन नबी) (चंद्रदर्शनावर अवलंबून) साजरी होणार आहे. त्याअनुषंगाने मार्गदर्शक सुचना जाहिर करण्यात येत असून त्याचे सर्वांनी पालन करावे. असे आवाहन अभिजीत राऊत, जिल्हादंडाधिकारी, जळगाव यांनी केले आहे.
कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर ईद-ए-मिलाद (मिलादुन नबी) हा सण इतर धार्मिक सणांप्रमाणे आपापल्या घरात राहूनच साजरा करण्यात यावा. राज्य शासनातर्फे सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांना बंदी असल्यामुळे ईद-ए-मिलाद (मिलादुन नबी) मिरवणूकीला एका ट्रकसह 10 इसमास परवानगी देण्यात येत आहे.
प्रवचनाचा कार्यक्रम शासनाच्या नियमांचे पालन करुन ऑनलाईन पध्दतीने आयोजित करण्यात यावा, त्याचे केबल टि.व्ही. फेसबुक इत्यादी माध्यमातून थेट प्रक्षेपणाव्दारे इतरांना पाहण्याची व्यवस्था करावी, प्रतिबंधित (Containment) क्षेत्रामध्ये सध्या लागू करण्यात आलेले निर्बंध कायम राहतील.
कोविड-19 या विषाणूच्या अनुषंगाने जळगाव जिल्ह्यात मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 चे पोटकलम (1) व (3) अन्वये मिरवणूकी दरम्यान रस्त्यावर पाचपेक्षा जास्त व्यक्तीनी एकत्र येवू नये, शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करुन हा सण घरी राहून साधेपणाने साजरा करावा, तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात यावे, सोसायटीमधील नागरीकांनी देखील एकत्रीत जमून सण साजरे करु नये, कोविड-19 च्या परिस्थितीचा विचार करता रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरे असे उपक्रम राबविण्यात यावेत व या उपक्रमांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात यावी,
कोविड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैदयकीय शिक्षण विभाग तसेच संबंधीत महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील, तसेच या परिपत्रकानंतर व प्रतिकात्मक स्वरुपातील मिरवणूक सुरु होण्याच्या मध्यल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे, जळगाव जिल्ह्यात ईद ए मिलाद (मिलादुन नबी) मिरवणूका वरील नमूद केलेल्या शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे पोलीस प्रशासनाची पुर्व परवानगी घेऊन प्रतिकात्मक स्वरुपात काढण्यात याव्यात. असेही श्री. राऊत, जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.