अमळनेर प्रतिनिधी । शहरातील उपमुख्याधिकारी बेपत्ता झाले होते ते आता घरी परतले असून याच प्रकरणात अमळनेर पोलीस निरीक्षक यांची तात्काळ नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली.
शहरातील बॅनर हटवल्याने उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला. तर दुसरीकडे त्यांनी दिलेल्या तक्रारीची दखल घेतली नाही. त्यामुळे नाराज होत गायकवाड यांनी सोशल मीडियावर आत्महत्येचा संदेश देणारी व्हिडिओ क्लिप व्हायरल केली व गुरुवारी बेपत्ता झाले होते. यानंतर चोपडा शहरात त्यांची कार सापडली.
मात्र, पोलिसांना ते सापडले नव्हते. शुक्रवारी रात्री २ वाजता गायकवाड यांनी मोबाइलवरून त्यांच्या पत्नी वर्षा यांना संपर्क साधला. पत्नीने समजूत घातल्यानंतर संदीप गायकवाड घरी परतले. मात्र त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. तर दुसरीकडे याच प्रकरणात संदीप गायकवाड यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यासाठी टाळाटाळ केल्यामुळे अमळनेर येथील पोलिस निरीक्षक अंबादास मोरे यांची काल रात्री तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली.