धुळे : भाजपमध्ये मिळणाऱ्या वागणुकीमुळे नाराज असलेले माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी पक्षाला रामराम करत राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांच्यापूर्वी धुळ्यातील नेते अनिल गोटे यांनीही भाजपचा राजीनामा देत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. आता हे दोन्ही नेते मिळून उत्तर महाराष्ट्रात काय राजकीय बदल घडवून आणतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.भाजपात गेलेल्या कार्यकर्त्यांना पुन्हा पक्षात येण्याचे निमंत्रण – गोटे.
उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या ताब्यात असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये येणाऱ्या काळात सत्तांतर होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी एक पत्रक काढून भाजपात गेलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पुन्हा पक्षात येण्याचे निमंत्रण दिले आहे. सध्या हे पत्रक राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे.
सध्या धुळे जिल्ह्यात धुळे महानगरपालिका, दोंडाईचा नगरपालिका आणि शिरपूर नगरपालिका येथे भाजपची एकहाती सत्ता आहे. या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्तांतर करण्यासाठी एकनाथ खडसे आणि राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे हे एकत्र येऊन काम करतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे.
यावेळी गोटे म्हणाले की,”सध्या माझ्या संपर्कात भाजपचे १६ नगरसेवक आहेत आणि अनेक जिल्हा परिषद सदस्य देखील आहेत, परंतु पक्षश्रेष्ठींचा आदेश येईपर्यंत सध्या तरी काहीच हालचाली आम्ही करणार नाही. आदेश आला की 24 तासात चमत्कार दिसेल”.
असे आहे अनिल गोटे यांचे परिपत्रक
एकनाथराव खडसे आणि अनिल गोटे यांच्या एकत्रित येण्याने उत्तर महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे हात बळकट होण्यास मदत होणार आहे. एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी नुकत्याच काढलेल्या एका पत्रकात भाजपात गेलेल्या राष्ट्रवादीच्या जुन्या कार्यकर्त्यांना पुन्हा पक्षात प्रवेश करण्याचे आवाहन केले आहे.
सध्या हे पत्रक देखील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे. धुळे महानगरपालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे. मात्र, यातील बहुतांश नगरसेवक हे राष्ट्रवादीतून भाजपात गेले आहेत. येणाऱ्या काळात हेच नगरसेवक पुन्हा राष्ट्रवादीत आल्यास धुळे महानगरपालिकेत सत्तांतर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनिल गोटे यांनी पत्रकाद्वारे केलेल्या आवाहनाला भाजपात गेलेले राष्ट्रवादीचे जुने कार्यकर्ते कितपत प्रतिसाद देतात हे औत्सुकत्याचे आहे.
अजून वाचा
‘मिशन जळगाव महापालिका’ – एकनाथराव खडसे


