जळगाव – शहरासह राज्यातील अनेक जिल्ह्यात मनपा मालकीच्या व्यापारी संकुलातील गाळे कराराची मुदत संपली असून शासनाचे धोरण ठरत नसल्याने पुढील दिशा अद्याप निश्चित होत नाही. जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे जिल्ह्यात आले असता माजी आ.डॉ.गुरुमुख जगवाणी यांनी गाळेधारकांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांना साकडे घातले.
जळगाव मनपासह राज्यातील अनेक मनपा मालकीच्या गाळ्यांचा करार संपुष्टात आला असून मनपाने गाळे ताब्यात घेत लिलाव करण्याची भूमिका घेतली आहे. जळगाव शहरासह राज्यातील लाखो कुटुंबांचा संसार मनपाच्या व्यापारी गाळ्यांवर अवलंबून आहे. गेल्या अनेक वर्षापासून शासनस्तरावर कोणतेही ठोस धोरण निश्चित केले जात नसल्याने आजपर्यंत त्यावर तोडगा निघालेला नाही. गाळेधारकांवर अन्याय होऊ नये यासाठी महाआघाडी सरकारच्या काळात लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी माजी आ.डॉ.गुरुमुख जगवाणी यांनी ना.जयंत पाटील यांच्याकडे केली. ना.पाटील यांनी याविषयी निर्णय घेण्यासाठी लवकरच मंत्रालयात बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे. डॉ.जगवाणी यांची चर्चा सुरू असताना माजी मंत्री गुलाबराव देवकर, आ.अनिल पाटील, आ.किशोर पाटील, माजी खा.मनीष जैन, माजी आ.राजीव देशमुख यांनी देखील सहभाग नोंदवित व्यापारी संकुलांचा प्रश्न गंभीर असून लवकरात लवकर सोडविण्याची मागणी केली.