जळगाव : मेहरूण तलावाच्या काठी मरणासन्न अवस्थेत पोहोचलेल्या एका निंबाच्या झाडाला आज सकाळी डॉ. महेंद्र काबरा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जीवदान दिले आहे. शिवाय तलावाच्या काठावर असलेल्या इतर झाडांसाठी पाण्याची व्यवस्था करून व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी निसर्गावरील आपले प्रेम व्यक्त केले आहे.
आज सकाळी मेहरूण तलावाच्या काठावर फिरत असताना निंबाचे झाड मरणासन्न अवस्थेत तुटलेल्या अवस्थेत डॉ. महेंद्र काबरा, प्रा. एस. व्ही. सोमवंशी, मयुर पाटील यांना दिसले. हे झाड तलावाकाठी फिरणार्या बकऱ्या, गायी, म्हशींच्या भक्ष्यस्थानी पडले होते. या झाडांची अवस्था पाहून सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे डॉ. महेंद्र काबरा यांचे हृदय द्रवले. त्यांनी लगेचच झाडाला वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. या झाडाला पाणी देऊन त्याला सरक्षण कुंपण करण्यात आले आहे.
अन्य झाडांसाठी पाण्याची नियोजन
मेहरूण तलावाच्या काठावर वृक्षारोपण करण्यात आले मात्र पाण्याचे नियोजन पुरेशा पद्धतीने करण्यात आलेले नाही. त्यासाठी डॉ. महेंद्र काबरा यांनी 20 लिटर क्षमतेचे 10 केन आणल्या आणि त्यात पाणी भरून उर्वरित झाडांना पाणी देण्याची व्यवस्था केली आहे. इतर झाडांना पाणी देण्यासाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे.
तलावात फेकलेल्या वस्तुंचा केला उपयोग
मेहरूण तलावात आणि काठावर नागरिक असंख्य वस्तू आणून फेकत असतात. त्या वस्तूंचा वापर करून इतर झाडांसाठी कुंपण तयार करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने तलावात मध्ये पिकलेल्या पूजेतील विविध वस्तूंचा वापर करण्यात आलेला आहे. तलावात फेकलेली करदोडे, कपडे, धागेदोरे, साड्या यांचा वापर करून झाडांसाठी कुंपण तयार करण्यात आले. याशिवाय तलावाच्या काठावर अनेक मातीचे मडके फेकलेले असतात, या मडक्यांत पाणी भरून प्रत्येक झाडाच्या बुंध्याजवळ ठेवण्यात आलेले आहे, जेणेकरून दिवसभर त्या झाडाला थेंब थेंब पाणी मिळत राहील. आज व्हॅलेंटाईन डे चा दिवस आहे जो तो आपापल्या परीने प्रेम व्यक्त करतो यानिमित्ताने निसर्गावर असलेले प्रेम आज व्यक्त करता आल्याची भावना प्रा. सोमवंशी यांनी बोलून दाखवली.
मरणासन्न झाडाला वाचवण्यासाठी डॉ. महेंद्र काबरा यांच्याबरोबर सीए संजय दारा, सौ. जानकी दारा, उन्नती दारा, अभियंता भाऊसाहेब गणेश पाटील , अभियंता मयुर पाटील यांच्यासह डीवायएसपी मा. श्री. विलास सोनवणे यांचे सहकार्य लाभले.