जळगाव प्रतिनिधी । शहरातील गंधर्व कॉलनीत एक बंद घर फोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला. बाजूच्या लोक जागी झाल्याने चोरटे पसार झाले. सुदैवाने चोरट्यांना खाली हात जावे लागले. सदरील घटना हि जिल्हापेठ पोलीस स्थानकाच्या हद्दीत झाल्याचे समजते.
जळगाव शहरातील गंधर्व कॉलनीतील रहिवाशी व्ही. एम. पाटील हे कुटुंबीयांसह बाहेरगावी गेलेले आहेत. ही संधी साधुन चोरट्यांनी मंगळवारी रात्री १२.३० वाजता त्यांच्या घराच्या मागच्या चॅनलगेटचे कुलूप तोडून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. यावेळी लोखंडी गेटचे कुलूप तोडत असताना आवाज झाल्यामुळे शेजारी राहणारे लोक झोपेतून जागे झाले. त्यांनी बाहेर येऊन लाईट सुरू केल्यामुळे चोरट्यांनी पाटील यांच्या अंगणातून धुम ठोकली. यांनतर चोरटे पुन्हा या घराकडे आले नाहीत. काही वेळाने चोरट्यांनी याच परिसरातील सुरेश विश्वनाथ अकोले यांचे बंद घर फोडले. अकोले दाम्पत्य बाहेरगावी गेलेले असल्याने त्यांचेही घर बंद होते. चोरट्यांनी कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त केले. परंतु, त्यांना घरातून काहीच ऐवज मिळाला नाही. बुधवारी पहाटे पाच वाजता अकोले यांच्या घरातील लाईट सुरू असल्याचे दिसल्याने शेजारी राहणाऱ्या नागरीकांनी चौकशी केली. त्यांच्या घरात चोरी झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर अकोले यांना कळवण्यात आले. यानंतर अकोले यांनी नातेवाईकांना पाठवून घराला दुसरे कुलूप लावुन घेतले आहे. नागरीकांनी घटनेची माहिती जिल्हापेठ ोलिसांना दिल्यानंतर पथकाने या परिसरात तपासणी केली.