मुंबई, वृत्तसंस्था : मुंबई परिसरात घर घेण्याचं स्वप्न पाहत सर्वसामान्यांच्या आयुष्यातील अनेक रात्री पैशांची आकडेमोड करण्यात जाते. मुंबईसह आजूबाजूच्या प्रदेशात घर घेणं म्हणजे अनेकांचं आयुष्य खर्ची होतं. कारण आहे इथल्या घरांच्या किमती आणि म्हणून म्हाडाच्या घरांची लॉटरी म्हणजे एक पर्वणी असते.
म्हाडाच्या घराच्या लॉटरीसाठी चातकासारखी वाट बघणाऱ्यांना एक खुशखबर आली आहे. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात लॉटरीसाठी म्हाडा ऑनलाइन अर्जप्रक्रीया स्वीकारणं सुरू करणार आहे. यात सुमारे 8 हजार घरांचा समावेश आहे. म्हाडाची घरं म्हटलं तर बाजारभावापेक्षा कमी किंमत घरांची. म्हणूनच म्हाडाचं घर मिळावं यासाठी हजारो लोक प्रत्येक म्हाडा लॉटरीवेळी अर्ज करत असतात. यावेळी ठाणे, कल्याण, नवी मुंबई भागातील सुमारे 8 हजार घरांची लॉटरी करण्याचा मानस म्हाडाचा आहे. ज्याची तयारी पूर्ण झाली असून लवकरच त्याची जाहीरात म्हाडा प्रसिद्ध करणार आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नुकताच होऊ घातलेली लॉटरी आणि त्यातील घरांचा आढावा घेतला. त्यांच्या मते, ‘म्हाडाची संपूर्ण तयारी झाली असून लवकरच आम्ही त्याबद्दलची जाहिरात प्रकाशित करणार आहोत.’
ही घरं म्हाडाच्या कोकण बोर्डाच्या अखत्यारीत येतात. म्हाडामध्ये मुंबई बोर्ड जे मुंबईतील घरांची लॉटरी काढतं आणि त्याव्यतिरिक्त ठाणे, कल्याण, नवी मुंबई याभागात घर बांधणं किंवा लॉटरी काढणं हे कोकण बोर्डाच्या अखत्यारीत येते. या कोकण बोर्डाच्या लॉटरीत 3 वेगवेगळ्या प्रकारची घरं आहेत. ज्यात प्रधानमंत्री आवास योजना, दुसरी म्हाडाने बांधलेली घरं आणि तिसरी म्हणजे सर्वसमावेश घर योजनेतील खासगी विकासकाकडून म्हाडाला मिळालेली घरं, यांचा समावेश आहे.
या लॉटरीत कुठे आणि किती घरं असतील?
घरांचं ठिकाण-वर्तकनगर, ठाणे एकूण घरं – 67
घरांचं ठिकाण– ठाणे शहर- विखुरलेली एकूण घरं- 821
घरांचं ठिकाण– घणसोली, नवी मुंबई एकूण घरं- 40
घरांचं ठिकाण– भंडार्ली, ठाणे-ग्रामीण एकूण घरं-1771
घरांचं ठिकाण–गोठेघर-ठाणे ग्रामीण एकूण घरं- 1185
घरांचं ठिकाण–खोणी-कल्याण ग्रामीण एकूण घरं- 2016
घरांचं ठिकाण- वाळीव-वसई एकूण घरं- 43
कोकण बोर्डाचे मुख्याधिकारी नितीन महाजन यांनी दिलेल्या माहितीनुसार घरांचा हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. कारण मागच्या लॉटरीत न गेलेली घरं किती आहेत ही माहिती एकत्र केली जात आहे. त्यामुळे जर जमलं तर 8000 पेक्षाही अधिक घरांची यावेळी लॉटरी काढली जाईल.
याही लॉटरीच्या वेळी म्हाडाला भरावी लागणारी अनामत रक्कम बँकेकडून मिळावी यासाठी म्हाडा लवकरच एका बँकेच्या नावावर शिक्कामोर्तब करणार आहे. म्हणजे या बँकेतून अगदी नाममात्र व्याजावार अनामत रक्कमही मिळू शकेल आणि कागदपत्रेही याचं बँकेत लाभार्थ्यांना सुपूर्द करता येतील. त्यासाठी म्हाडाने बँकासाठी जाहिरात काढली आहे. यातील अटीशर्थीत बसणाऱ्या बँकेला निवडलं जाईल, जेणेकरुन अर्जदात्यांना पैशांची जमवाजमव करण्यासाठी मनस्तापाला सामोरं जावं लागणार नाही. मार्चमध्ये अर्ज भरण्यास सुरुवात झाल्यानंतर मे महिन्यात याची लॉटरी काढली जाईल आणि विजेत्यांचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होईल.