जळगाव प्रतिनिधी । शहरातील सरकारी कर्मचाऱ्यांची पतपेढी ग.स.सोयायटीत एका कर्मचाऱ्याच्या नियमित वेतन श्रेणीत आदेशाचा बनावट व खोटा दस्त बनवून पतपेढीची फसवणूक करणाऱ्या माजी अध्यक्ष विलास नेरकर यांच्यासह तत्कालीन व्यवस्थापक यांच्या विरोधात शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ग.स. सोसायटीवर ३ फेब्रुवारी २०२१ पासून प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे. ग. स. सोसायटीमध्ये विलास यादवराव नेरकर हे अध्यक्षपदी असतांना फेब्रुवारी २०१९ मध्ये ३६ लिपीक व २७ शिपाई असे एकुण ६३ पदांची भरती करण्यात आली होती. त्यावेळी निवड झालेल्या पदांच्या नियुक्ती पत्रांवर तत्कालिन अध्यक्ष विलास नेरकर, तत्कालिन व्यवस्थापक संजय दत्तात्रय ठाकरे आणि प्रशासन अधिकारी जयंत साहेबराव साळुंखे यांच्या साक्षऱ्या होत्या. पदांची भरती केल्यानंतर नियमानुसार सहा महिने प्रशिक्षण कालावधी संपल्यानंतर लिपीक व शिपाई पदावरील कर्मचाऱ्यांना नियमिती वेतनश्रेणी लागु करणेबाबत आदेश देण्यात आले.
प्रशिक्षण कालावधी दरम्यान ग.स. सोसायटीवर अध्यक्षपदाची सुत्रे मनोजकुमार पाटील यांच्याकडे होती. प्रशिक्षण कालावधीनंतर लिपीक व शिपाई पदाची नियमित वेतनश्रेणी लागू करण्याबाबत आदेश देण्यात आले होते. प्रशासन अधिकारी जयवंत साळुखे व तत्कालीन व्यवस्थापक संजय ठाकरे यांनी ६२ कर्मचाऱ्यांचे नियमित वेतन श्रेणीचे आदेश तयार करून त्यावर त्यांनी काऊन्टर सही केल्यानंतर मनोज पाटील यांनी नावांची यादी वाचून सही केली. दरम्यान सदर आदेशामध्ये विजय प्रकाशराव पाटील यांना नियमित वेतन श्रेणीचा कोणताही आदेश देण्यात आलेला नसतांना तत्कालिन अध्यक्ष विलास नेरकर व तत्कालिन व्यवस्थापक संजय दत्तात्रय ठाकरे यांनी संगनमत करून गैरफायद्यासाठी बेकायदेशीरपणे विलास पाटील यांच्या नियमित श्रेणीचे आदेशावर तत्कालिन अध्यक्ष विलास नेरकर हे अध्यक्षपद नसतांना बनावट व खोट्या आदेशावर सह्या केल्या आहे.
त्यामुळे संस्थेची ही फसवणूक असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी ग.स.सोसायटीचे तत्कालिन अध्यक्ष मनोजकुमार पाटील यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात तत्कालिन अध्यक्ष विलास नेरकर, तत्कालिन व्यवस्थापक संजय दत्तात्रय ठाकरे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक धनंजय वेरूळे करीत आहे.