मुंबई : ज्याप्रकारे मुंबई इंडियन्सने अत्यंत एकतर्फी झालेल्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जला लोळवले होते,यावरून रविवारी मुंबईकर राजस्थान रॉयल्सवरही भारी पडणार, अशी खात्री होती. मात्र राजस्थानने जोरदार प्रयुत्तर देताना मुंबईला धक्कादायकरीत्या पराभूत केले.
या दोन्ही सामन्यांत मुंबईला कमतरता भासली, कारण कर्णधार ‘हिटमॅन’ रोहित शर्मा आजारी असल्याने तो या दोन्ही सामन्यात खेळू शकला नव्हता. मात्र आता लवकरच मैदानावर दिसेल, अशी माहिती मुंबई इंडियन्सकडून मिळाली आहे.
रविवारी राजस्थानविरुद्ध मोठी धावसंख्या उभारुनही मुंबईला पराभवाचा धक्का बसला. हा सामना जिंकून मुंबईला प्ले ऑफ प्रवेश करण्याची नामी संधी होती. मात्र त्यांना आता आणखी प्रतीक्षा करावी लागेल. आता हिटमॅन रोहित शर्माही पुनरागमन करणार असून मुंबईचा प्ले ऑफ प्रवेश फार दूर नसेल असा विश्वास चाहत्यांना आहे.
राजस्थानविरुद्ध झालेल्या पराभवानंतर मुंबईचा स्टार सलामीवीर क्विंटन डीकॉक याने सांगितले की, ‘रोहितची तब्येत खूप लवकर सुधारत आहे. असे असले तरी त्याच्या पुनरागमनाबाबत आत्ताच काही ठामपणे सांगणे कठीण आहे. मात्र लवकरच तो पूर्णपणे तंदुरुस्त होईल आणि मैदानावर खेळताना दिसेल.’