मुंबई, वृत्तसंस्था : मुंबई पोलिसांनी एका बंगल्यावर छापा टाकून लाइव्ह अश्लील व्हिडीओ तयार करत असलेले एक रॅकेट उद्ध्वस्त केले. या प्रकरणात पोलिसांनी पाच जणांना अटक केली. अटक केलेल्यांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे.
मालाड पश्चिमेच्या मढ भागातील ओल्ड फेरी मार्ग वर ग्रीन पार्क नावाचा बंगला आहे. या बंगल्यात लाइव्ह अश्लील व्हिडीओची निर्मिती सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. एका खबऱ्याकडून मिळालेल्या या माहितीआधारे चहूबाजूने घेराव घालून बंगल्यावर धड टाकली. खबऱ्याने दिलेली माहिती खरी असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. बंगल्यात अश्लील व्हिडीओच्या निर्मितीचे काम सुरू होते.
पोलिसांनी घटनास्थळावरुन एक महिला कॅमेरामन, एक महिला ग्राफिक डिझायनर आणि अन्य तीन जणांना अटक केली. पकडलेल्यांमध्ये दोन महिला तांत्रिक बाजू सांभाळत असल्याचे बघून पोलीस चक्रावले. घटनास्थळावरुन पोलिसांच्या पथकाने एका २५ वर्षांच्या तरुणीला वाचवले. तिला सुरक्षितरित्या बंगल्याबाहेर नेण्यात आले. वैद्यकीय तपासणीनंतर तिची चौकशी होणार असल्याचे वृत्त आहे.
ज्या तरुणीला वाचवले तिला दिशाभूल करणारी माहिती देऊन बंगल्यावर आणण्यात आले होते. लाइव्ह अश्लील व्हिडीओ तयार करणाऱ्या टीमचे सदस्य अनेक तरुणींना मनोरंजनसृष्टीत काम मिळवून देण्याचे आश्वासन देऊन अश्लील व्हिडीओ तयार करण्यासाठी भाग पाडत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मढच्या अनेक बंगल्यांमधून अश्लील व्हिडीओंच्या निर्मितीची रॅकेट सक्रीय आहेत. अधूनमधून बंगल्यावर येऊन गुपचूप व्हिडीओ तयार करण्याचे काम सुरू असते. यावेळी अचूक माहिती मिळाल्यामुळे बंगल्यावर शूटिंग सुरू असताना छापा टाकून कारवाई करणे शक्य झाले. अनेकदा पोलिसांच्या हालचालींची माहिती अश्लील व्हिडीओ तयार करणाऱ्यांपर्यंत पोहोचते आणि ते पळून जातात असे पोलिसांनी सांगितले.
अश्लील व्हिडीओ प्रकरणात अटक केलेल्या पाचजणांविरोधात भारतीय दंडविधानांतर्गत फसवणूक, आक्षेपार्ह आणि अश्लील वर्तणूक, सार्वजनिकरित्या आक्षेपार्ह आणि अश्लील साहित्याची विक्री, वितरण आणि माहिती तंत्रज्ञान कायदा यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला. अश्लील व्हिडीओ तयार करणारे ज्या बँक खात्याच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार करत होते त्या खात्याला गोठवण्यात आले आहे. मागील काही महिन्यांतील या खात्यातील व्यवहारांची तपासणी केली जाणार आहे.
खात्यात ३६.५ लाखांपेक्षा जास्त रक्कम आहे. हा पैसा प्रामुख्याने अश्लील व्हिडीओंशी संबंधित अॅपकडून जमा झाला आहे. प्रामुख्याने ‘व्हिडीओ सबस्क्रिप्शन फी’ असल्याचे पोलिसांनी सांगितले. सर्व आरोपींचे मोबाइल जप्त केले असून त्यातील व्हॉट्सअॅप चॅटची तपासणी सुरू आहे. आतापर्यंतच्या चौकशीतून पकडलेले रॅकेट किमान दीड वर्षांपासून सक्रीय असल्याचे लक्षात आले, असे पोलिसांनी सांगितले. आरोपींनी लाइव्ह अश्लील व्हिडीओ तयार करण्यासाठी दोन जणांना माणशी ५ ते १५ हजार दरम्यान रक्कम दिली होती. पैशांच्या बदल्यात काम करण्यासाठी संबंधितांसोबत लेखी करार केला होता.
पोलिसांनी छापा टाकला त्यावेळी अश्लील व्हिडीओ तयार करणारी प्रॉडक्शन टीम कलाकारांना विशिष्ट अंगविक्षेप करण्यासाठी सूचना देत होती. छापा टाकून कलाकारांना वाचवण्यात आले. यातच एक २५ वर्षांची तरुणी होती. या तरुणीची प्राथमिक चौकशी झाली आहे. वैद्यकीय तपासणीनंतर तिची आणखी चौकशी होणार असल्याचे समजते.
अश्लील व्हिडीओ बघणाऱ्यांची मोठी बाजारपेठ भारतासह जगभर पसरली आहे. यातही पैसे मोजून अश्लील व्हिडीओ बघणाऱ्यांची संख्या वाढत आहे. या मंडळींच्या विशिष्ट मागण्यांची दखल घेत अश्लील व्हिडीओ आणि अश्लील लाइव्ह व्हिडीओ तयार केले जातात. ‘सबस्क्रिप्शन फी’ स्वरुपात मोठी रक्कम घेऊन त्या बदल्यात अश्लील व्हिडीओ तयार करणारे नियमितपणे मोठी कमाई करतात. यात तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. अनेक गोष्टींचा जास्त बभ्रा होणार नाही याची पुरेशी काळजी घेतली जाते. याच कारणामुळे अनेकदा एखाद्या भागात अश्लील व्हिडीओ तयार होत असले तरी त्याची माहिती लवकर मिळत नाही. मात्र यावेळी ठोस माहिती मिळाली आणि कारवाई करणे शक्य झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
काही वृत्तपत्रांमधून सिनेमासाठी नव्या चेहऱ्यांची आवश्यकता आहे, अशी जाहिरात प्रसिद्ध झाली. ही जाहिरात आली त्याचवेळी सतर्क झालेल्या पोलिसांच्या खबऱ्याने नेमकी माहिती मिळवून पोलिसांना दिली. यामुळेच छापा टाकून कारवाई यशस्वी करणे शक्य झाल्याचे पोलिसांनी सांगितले.