जळगाव – शहरात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळूची वाहतूक वाढली असून यावर वचक बसावा म्हणून कारवाया करण्यात येत आहेत. याच पाश्र्वभूमीवर अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या डंपरचा पाठलाग करून चालकासह क्लिनरला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात चालक, मालक आणि क्लिनरवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दोन लाख रुपये किमतीचे डंपर व दोन ब्रास वाळू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे
जळगाव शहरातील कांचन नगर परिसरात शनिवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास रेल्वेलाईन ममुराबादकडून जळगावात विना नंबर क्रमांक डंपरमध्ये अवैधरित्या वाळूची वाहतूक करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बापू रोहोम यांना मिळाली .
त्यानुसार बापू रोहम यांनी सपोनी स्वप्नील नाईक, पो.ना. विजय पाटील, नंदलाल पाटील, सचिन महाजन यांच्या पथकाने डंपरचा पाठलाग करुन शनीपेठ पोलीस हद्दीतील भिलपूरा पोलीस चौकीजवळ डंपर थांबविले. डंपरचालक शेख रईस शेख रऊफ (वय-२३) आणि शेख शाबीर शेख युनूस (वय-१९) रा. ख्वाजा चौक आव्हाणे रा. खेडी ता.जि.जळगाव यांना अटक केली आहे.
हे वाहन भूषण सपकाळे (पुर्ण नाव माहित नाही) रा. खेडी ता.जि.जळगाव असल्याची माहिती मिळाली असुन दोघांसह त्याच्याविरोधात पोलीस कॉन्टेबल सचीन प्रकाश महाजन यांच्या फिर्यादीवरुन शनीपेठ पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पुढील तपास पोहेकॉ किरण पाठक करीत आहे. दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले होते.