जळगाव : कर्करोग होण्यासाठी कारणीभूत घटकांपासून दूर राहिले पाहिजे. गुटखा, तंबाखू यासारख्या अमली पदार्थाना तर लांबच ठेवा. तेव्हाच आपण ‘कॅन्सर’ला ‘कॅन्सल’ म्हणू शकतो, असे प्रतिपादन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी केले.
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालयातर्फे जागतिक कर्करोग दिनानिमित्त विशेष कार्यक्रम गुरुवारी ४ फेब्रुवारी रोजी घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण, प्रशासकीय अधिकारी डॉ. यु.बी.तासखेडकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैभव सोनार, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास जयकर, उपवैद्यकीय अधिक्षक डॉ. इम्रान पठाण, परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. विद्या राजपूत, अधिसेविका कविता नेतकर, जिल्हा मौखिक अधिकारी संपदा गोस्वामी उपस्थित होते.
यावेळी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उदघाटन झाले. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे जिल्हा सल्लागार डॉ. नितीन भारती यांनी प्रस्तावनेत कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चव्हाण म्हणाले की, व्यक्तीने निर्व्यसनी आयुष्य जगले पाहिजे. तसेच सिगारेटचा एक झुरका वाढत गेला तर अकाली मृत्यूकडे घेऊन जातो, त्यामुळे कर्करोग न होण्यासाठी व्यसने टाळावी असे सांगितले.
अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी सांगितले की, कर्करोग रोखणे आपल्या हातात आहे. विद्यार्थ्यांच्या मदतीने कर्करोगमुक्त समाज निर्माण करण्यासाठी प्रयत्न व्हावे. कर्करोग झाला तर त्या व्यक्तींसह त्याच्या परिवाराला प्रचंड दुःख भोगावे लागते. म्हणून अमली पदार्थांपासून लांब राहा असेही आवाहन डॉ. रामानंद यांनी केले. यावेळी कर्करोगमुक्त झालेल्या राजमोहम्मद शिकलगार यांचा सत्कार करण्यात आला. तसेच, रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
यात प्रथम – अंकिता अहिरे, द्वितीय – आरती गावंडे, तृतीय – ज्ञानेश्वरी बोरकर यांनी प्राविण्य मिळविले. सूत्रसंचालन व आभार चंद्रकांत ठाकूर यांनी केले. कार्यक्रमासाठी डॉ. स्वप्नजा तायडे, रुचिका साळुंखे, सामाजिक कार्यकर्ता राहुल बऱ्हाटे, समुपदेशक निशा कढरे यांनी परिश्रम घेतले.