जळगाव – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व सभा ऑनलाईन पध्दतीने घेण्याचे शासनाचे आदेश होते. मिशन बिगीन अंतर्गत काही निर्बंध हटविले असून जळगाव मनपाची महासभा ऑफलाईन पद्धतीने घेण्यास परवानगी द्यावी यासाठी आजवर महापौर सौ.भारती सोनवणे यांनी राज्याच्या प्रधान सचिवांना १५ पत्रे पाठवली होती.
गेल्या महासभेत ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेल्या महासभेत मोठा गोंधळ उडाला होता. पुढील महासभा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात यावी असा निर्णय सर्व सदस्यांनी घेतला होता. निर्णयाच्या अनुषंगाने महापौरांनी प्रधान सचिवांना याबाबत पत्र पाठविले असून सभा ऑफलाईन घेणार असल्याचे कळविले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व सभा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात याव्या असे निर्देश शासनाने जारी केले होते. कोरोनातील नियम अटी शिथिल करण्यात आल्यानंतर देखील जळगाव शहर मनपाची महासभा ऑफलाईन पद्धतीने घेण्यास परवानगी देण्यात आलेली नव्हती. महापौर सौ.भारती सोनवणे यांनी महासभा ऑफलाईन पद्धतीने घेण्यास परवानगी द्यावी यासाठी शासनाला १५ पत्रे पाठवली आहेत. शासनाकडून परवानगी मिळत नसल्याने बुधवारी मनपात ऑनलाईन पद्धतीने महासभा घेण्यात आली.
महासभा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येत असल्याने इंटरनेट कनेक्टिव्हिटी योग्य नसल्याने अनेक सदस्यांना इतर सदस्यांचे आवाज ऐकू येत नव्हते. काही महिला सदस्यांकडे अँड्रॉइड मोबाईल नसल्याने त्यांना सभेत सहभागी होण्यास अडचण येते. सर्व सदस्यांच्या तक्रारी लक्षात घेता पुढील महासभा ऑफलाईन पध्दतीने घेण्यात यावी असा निर्णय सर्व सदस्यांनी घेतला. महासभेतील निर्णयाच्या अनुषंगाने महापौर सौ.भारती सोनवणे यांनी राज्याच्या नगरविकास प्रधान सचिवांना पत्र पाठवून पुढील महासभा ऑफलाईन पध्दतीने घेणार असल्याचे कळविले आहे.