मुंबई : राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न महाविद्यालयांतील नियमित वर्ग १५ फेब्रुवारीपासून सुरु होणार असल्याची घोषणा उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत केली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ५ मार्चपर्यंत ५० टक्के उपस्थितीत वर्ग चालवून नंतर उपस्थिती वाढविण्यात येणार असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले. शाळा सुरू झाल्या पण महाविद्यालय नाहीत, ही बाब विसंगत असल्याचे कुलपती व राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अलीकडेच म्हटले होते. १ फेब्रुवारीला सामंत यांनी राज्यातील सर्व कुलगुरूंची बैठक घेत महाविद्यालये सुरू करण्याबाबत भूमिका निश्चित केली. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जागेची उपलब्धता पाहून ५० टक्क्यांपर्यंत विद्यार्थ्यांना रोटेशन पद्धतीने वर्गात प्रवेश देण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेण्यात आला असल्याचे सामंत यांनी सांगितले.
७५ टक्के उपस्थिती अनिवार्य नाही
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित आणि आरोग्याची काळजी घेऊन विद्यापीठाच्या नियमानुसार विद्यार्थ्यांची उपस्थिती ७५ टक्के बंधनकारक न करता उपस्थिती संदर्भात ऑफलाईन / ऑनलाईन दोन्ही पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन द्यावेत, असेही सामंत यांनी सांगितले.
वसतिगृहे ही सुरू होणार
वसतिगृह टप्प्याटप्प्याने सुरु करण्यासाठी मार्गदर्शक सूचना तयार करुन वसतिगृहांचे इलेक्ट्रिक व सेफ्टी ऑडिट करण्याच्या सूचना विद्यापीठांना देण्यात आल्या आहेत. परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांना ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पर्याय उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत