जळगाव – येथील गांधी रिसर्च फाऊण्डेशन आणि कृषी विज्ञान केंद्र जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय मधुमक्षिका पालन व मध संकलन प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन मंगळवार दि. 02 रोजी करण्यात आले होते. बोरअजंटी लगत असलेल्या परिसरातील सुमारे 60 शेतकऱ्यांनी या कार्यशाळेत सहभाग घेत लाभ घेतला. आदिवासी शेतकरी बांधवांचे आर्थिक जीवनमान उंचवावे हा सुद्धा त्यामागील एक हेतू होता.
सातपुडा पर्वतासारख्या दुर्गम भागात वास्तव्यास असणाऱ्या आदिवासी शेतकऱ्यांचे उत्पन्नाचे साधन म्हणून मधाची भूमिका महत्त्वाची असते. थोड्याफार प्रमाणात त्याची विक्री करुन ते आपला उदरनिर्वाह करत असतात. हे लक्षात घेता जर त्यांना शास्त्रशुद्ध पद्धतीने मधुमक्षिका पालन करण्याचे शिक्षण दिले तर कुठलीही हिंसा न करता आदिवासी शेतकऱ्यांना शुद्ध मध संकलन करता येईल. त्याच सोबत मेण ही उपलब्ध होईल व त्यातून जास्त प्रमाणात त्याची विक्री करुन त्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यास मदत होईल.
प्रशिक्षणात प्रामुख्याने मधमाशांचे प्रकार, त्यांची उत्पत्ती त्यांचे खाद्य, परागीकरण प्रक्रिया, मध संकलन करताना घ्यावयाची काळजी हे सर्व शेतात प्रात्यक्षिक करुन दाखविण्यात आले. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी हे प्रशिक्षण घेऊन मधुमक्षिका पालन करावे, शेतकऱ्यांना त्या अनुषंगाने वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात येईल असे आव्हान कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. हेमंत बाहेती यांनी केले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी मुख्य प्रशिक्षक विद्यानंद अहिरे, आत्माचे उप संचालक कुरबान तडवी, डॉ. वैभव सूर्यवंशी किरण जाधव, डॉ. विशाल बैराग, महेंद्र साळुंखे, उपसरपंच ज्ञानेश्वर सुलताने आदि प्रमुख पाहुणे होते.
प्रशिक्षण यशस्वीतेसाठी बोरअजंटीचे ग्रामसेवक देवरे आप्पा, पोलिस पाटील सुनिल बारेला तसेच गांधी रिसर्च फाऊंडेशनचे स्वयंसेवक सुधीर पाटील, चंद्रकांत चौधरी, मयूर गिरासे, विक्रम अस्वार, ज्ञानेश्वर शिरसाठ यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत सूर्यवंशी यांनी तर आभार सागर चौधरी यांनी मानले.