मुंबई – वाहतूक पोलिसांना बॉडी कॅमेऱ्याची कवचकुंडले लाभणार आहेत. नुकतेच वाहतूक पोलिसांच्या ताफ्यात 1388 बॉडी कॅमेरे आले असून त्याचा पुढील आठवडय़ापासून वापर केला जाणार आहे.
शहरात वाहतूक कोंडीचे प्रकार होऊ नयेत याची खबरदारी वाहतूक पोलीस घेतात. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर पोलीस कारवाई करतात. कारवाई दरम्यान पोलिसांवरच हल्ले झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्या घटनांची गंभीर दखल घेण्यात आली आहे. सध्या मुंबई वाहतूक पोलिसांकडे 100 बॉडी कॅमेरे असून त्याचा वापर सण, उत्सव आणि बंदोबस्ताच्या वेळी केला जातो. पण आता वाहतूक पोलिसांच्या ताफ्यात 1388 नवीन बॉडी कॅमेरे आले आहेत. त्या कॅमेऱ्यांचा वापर पुढील आठवडय़ापासून केला जाणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
एखादी अनुचित घटना घडल्यावर पोलीस बॉडी कॅमेऱ्याच्या माध्यमातून तो प्रसंग रेकॉर्डिंग करतील. तसेच बॉडी कॅमेऱ्यामुळे वाहतूक पोलिसांसोबत हुज्जत घालण्याचे प्रकार कमी होतील, असा त्यामागील आशावाद आहे. या बॉडी कॅमेऱ्याचा वापर विमानतळावर सीआयएसएफ आणि रेल्वे सुरक्षा बलाचे जवान सध्या करत आहेत.