जळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे “नॉन कोविड” सुविधा सुरु झाल्यापासून गेल्या दीड महिन्यात ओपीडी काळात एकूण ११ हजार ३५८ नागरिकांनी ओपीडीतील वैद्यकीय सेवेचा लाभ घेतला आहे. तसेच, विविध आजाराविषयी २१५ गरजू रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. याठिकाणी अद्ययावत साधनसामुग्री, तज्ज्ञ वैद्यकीय यंत्रणा कार्यान्वित झाल्यामुळे नागरिकांना उत्तम सुविधा मिळत आहेत. अधिकाधिक नागरिकांनी ओपीडी सेवेचा लाभ घेण्यासाठी सकाळी उपस्थिती द्यावी, असे आवाहन रुग्णालय प्रशासनाने केले आहे.
कोरोनाच्या वैश्विक महामारीमुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय हे कोविड रुग्णालय म्हणून ५ एप्रिल २०२० पासून घोषित झाले होते. जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अधिकारी अभिजित राऊत यांनी बुधवारी १६ डिसेबर पासून हे रुग्णालय कोरोना व्यतिरिक्त सेवा देण्यासाठी सुरु करण्याची घोषणा केल्यावर गुरुवारी १७ डिसेंबर पासून कोरोना व्यतिरिक्त व्याधींसाठी वैद्यकीय सेवा प्रारंभ झाली.
रुग्णालयात औषधांचा साठा देखील मुबलक उपलब्ध आहे. दिवसभरात स्त्री रोग, बालरोग, दुखापती, सर्दी-खोकला, ताप, डोळे तपासणी, नाक-कान-घसा, लसीकरण, मधुमेह, हृदयरोग, दंतचिकीत्सा, किडनी आजार, प्राण्यांचे चावे, सोनोग्राफी, अस्थिविकार, मलेरिया, डेंग्यू, फुफ्फुस संबंधित, कुटुंब नियोजन, मनोविकार, त्वचारोग, मणका-सांध्याचे आजार याबाबत उपचार घेण्यासाठी तसेच ईसीजी, एक्सरे करण्यासाठी रुग्ण दवाखान्यात दररोज येत आहेत. सकाळी ८. ३० वाजेपासून १ वाजेपर्यंत ओपीडी सेवेची वेळ आहे. जिल्ह्यातील एकूण ६ हजार २३७ पुरुष व ५ हजार १२१ महिला अशा ११ हजार ३५८ रुग्णांनी ओपीडीतील वैद्यकीय सेवांचा गेल्या दीड महिन्यात लाभ घेतला आहे.
रुग्णालयात शस्त्रक्रिया विभाग अद्ययावत झालेला आहे. याठिकाणी गेल्या दीड महिन्यात २१५ लहान-मोठ्या प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वी झालेल्या आहेत. त्यात १७ डिसेंबरपासून १५ दिवसात ४२, जानेवारी महिन्यात १७३ शस्त्रक्रिया झालेल्या आहेत. यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांनी समाधान व्यक्त केलेले आहेत. नागरिकांच्या सोयीसाठी जनसंपर्क कक्ष तसेच गरजू गरीब नागरिकांना वैद्यकीय सेवा देण्यासाठी महात्मा फुले जनआरोग्य योजना कार्यालय सुरु झालेले आहे.
“शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अद्ययावत सोयीसुविधा सुरू झालेल्या आहे. नागरिकांनी अधिकाधिक वैद्यकीय सेवेचा लाभ घेण्यासाठी कोरोना काळामध्ये नागरिकांनी उपस्थिती द्यावी”
– डॉ.जयप्रकाश रामानंद, अधिष्ठाता.