जळगाव । ‘वीर जवान सागर धनगर अमर रहे’ ‘भारत माता की जय’ च्या जयघोषात वीरजवान सागर धनगर यांच्या पार्थिवावर आज सकाळी दहा वाजता त्यांच्या मूळगावी तांबोळे बुद्रुक, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. जवानाला शेवटचा निरोप देण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जवान सागर धनगर हे 5, मराठा इन्फ्रंटी बटालियनमध्ये सेनापती (मणिपूर) येथे कार्यरत होते. रविवार, 31 जानेवारी, 2021 रोजी सेनापती (मणिपूर) येथे त्यांना वीरगती प्राप्त झाली. त्यांच्या पार्थिवावर आज तांबोळे बु. येथे शोकाकुल वातावरणात हजारो नागरिकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
सुरुवातीस वीरजवान सागर धनगर यांच्या पार्थिवास सैन्य दलाच्या जवानांनी मानवंदना देऊन पुष्पचक्र अर्पण केले. त्यानंतर आमदार मंगेश चव्हाण, उप विभागीय अधिकारी श्री कचरे, तहसिलदार श्री मोरे यांच्यासह मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.
या वीर जवानावर शासकीय इतमामात गावापासून जवळच असलेल्या तांबोळे टेकडी येथे मोकळ्या जागेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. जवान सागर धनगर यांचा चुलत भाऊ देवेंद्र धनगर याने भावाच्या पार्थिवाला अग्नीडाग दिला. यावेळी तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण, तहसीलदार अमोल मोरे, ग्रामीणचे पोलीस निरीक्षक श्री. ठेंगे, सैन्य दलातील मराठा बटालियनचे सुभेदार संपत आमले, हवालदार रोहिदास पाटील, भैय्यासाहेब पाटील व खानदेश रक्षक ग्रुपसह इतर विविध संस्थांचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. अग्निडाग देण्यापूर्वी जवान सागर धनगर यांना सैन्यदल व पोलिसांतर्फे हवेत बंदुकीच्या गोळ्या झाडून मानवंदना देण्यात आली.
तत्पूर्वी सकाळी सागर यांचे पार्थिव त्यांच्या मुळगावातील घरी आणण्यात आले. कुटूंबिय व नातेवाईकांनी अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर फुलांनी सजविलेल्या ट्रॅक्टरमधून शोकाकूल वातावरणात त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. फुलांनी सजविलेल्या वाहनातून त्यांची अंत्ययात्रा तांबोळे बुद्रुक गाव व परिसरातून मोकळ्या मैदानात आली. अंतयात्रेच्यापुढे तिरंगा धरलेले तरुण चालत होते. वीर जवान यांच्यामागे आई रत्नाबाई धनगर, भाऊ अशोक असा परिवार आहे.
यावेळी अनेक मान्यवर व्यक्ती, संस्थांच्यावतीने वीरजवान सागर धनगर यांना श्रध्दांजली अर्पण करुन अभिवादन केले.