जळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा परिसर सोमवारी १ फेब्रुवारी रोजी विद्यार्थ्यांनी गजबजला. कोरोना महामारीमुळे मागील आठ महिने बंद असलेले महाविद्यालय अखेर खुले झाले. द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसह प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या देखील तासिका सुरु झाल्या आहे.
प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे पहिलेच वर्ष आणि पहिलाच दिवस होता. एकूण १५० विद्यार्थी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशित आहेत. पहिला दिवस म्हणून विद्यार्थ्यांना महाविद्यालयात सोडण्यासाठी विविध प्रांतातून पालक देखील आलेले होते. दक्षिण भारत, उत्तर भारत तसेच महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी जळगावात आलेले होते. पाल्याला निरोप देताना “काळजी घे, व्यवस्थित राहा” अशा सूचना पालकांकडून दिल्या जात होत्या. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा पुढील सहा दिवस फाउंडेशन कोर्स घेतला जाणार आहे.
महाविद्यालयाच्या पहिल्याच दिवशी द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या तासिका सुरु झाल्यामुळे अभ्यासक्रमाची माहिती घेणे, सहकारी मित्र-मैत्रिणींशी गप्पा करण्यात विद्यार्थ्यांचा पहिला दिवस गेला. प्राध्यापकांशी संवाद साधून त्यांना ‘कॉलेज’ कसे राहील आणि इतर माहिती विद्यार्थी विचारत होते. महाविद्यालयात झालेले बदल पाहून विद्यार्थी सुखावून गेले.