जळगाव : वैद्यकीय शिक्षण हे सामाजिक सेवेच्या दृष्टीने महत्वाचे शिक्षण आहे. महाविद्यालयात शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी एकमेकांशी बोला. संवाद वाढवा. मैत्रीपूर्ण सलोखा जोपासावा. तसेच, शिस्त व नियोजनबद्ध शिक्षण घेण्यासाठी कार्यरत राहावे, असे आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी विद्यार्थ्यांना केले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नवीन प्रवेशित प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ व अधिष्ठाता संदेश (डीन्स ऍड्रेस) सोमवारी १ फेब्रुवारी रोजी पार पडला. तसेच प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या तासिकादेखील सुरु झाल्या. यावेळी मंचावर उप अधिष्ठाता (पदव्युत्तर) डॉ. मारोती पोटे, उप अधिष्ठाता (पदवीपूर्व) डॉ. अरुण कसोटे, शरीरक्रियाशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. योगिता सुलक्षणे, जनऔषधशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. बिना कुरील, जीवरसायनशास्त्र विभागाच्या डॉ. धनश्री चौधरी उपस्थित होते.
प्रथम दिपप्रज्वलन करून धन्वंतरी पूजन करण्यात आले. यानंतर डॉ. कसोटे यांनी प्रस्तावनेत, महाविद्यालयाविषयी माहिती सांगून सहा दिवसांच्या फाउंडेशन कोर्सविषयी सांगितले. त्यानंतर अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी सांगितले की, या महाविद्यालयाच्या परिसरात आपण उच्च शिक्षण घेण्यासाठी आला आहेत. येथे शिस्त व अभ्यासाचे नियोजन तुमच्या भविष्यातील करिअरला आकार देईल. रोज वृत्तपत्रे वाचा, त्यातील ज्ञानपूर्ण घडामोडी पहा. वैद्यकीय क्षेत्र हे एक ‘नोबेल प्रोफेशन’ असून, ज्ञान, कौशल्याच्या बळावर या पवित्र क्षेत्रात नाव कमवा. यश मिळविण्यासाठी सातत्याने प्रयत्नरत राहा.
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून नामांकित डॉक्टर घडले. त्यामुळे प्रगती करण्यासाठी फार मोठी संधी असून, त्याचा विद्यार्थ्यांनी लाभ घेतला पाहिजे, असेही अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी विद्यार्थ्यांना “डीन्स ऍड्रेस” मधून सांगितले. याप्रसंगी विद्यार्थ्यांना रॅगिंग प्रतिबंधक समितीची, वसतिगृहाची माहिती इतर प्राध्यापकांनी दिली. तसेच प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली. यावेळी सूत्रसंचालन डॉ. मोनिका युनाती यांनी तर आभार डॉ. धनश्री चौधरी यांनी मानले.